फेसबुकसाठीही पैसे भरा : इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी

फेसबुकच्या शेअरच्या किमतीत सुरू असलेली घसरण अजूनही कायम आहे. त्यामुळे युझर्सची संख्या वाढत असली तरी कंपनीचा महसूल घसरत चालला आहे. त्यामुळेच महसूल निर्मितीसाठी कंपनीने नवीनवीन फंडे अमलात आणणे सुरू केले आहे. इतके दिवस वाढदिवस, लग्न असे मोफत असणा-या इव्हेंटच्या प्रसिद्धीसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. 


फेसबुकच्या पैसे कमविण्याच्या नव्या पद्धतीमध्ये वाढदिवस आणि लग्नाच्या इव्हेंटची प्रसिद्धी करण्याचा सशुल्क पर्याय देण्यात येणार आहे. हे इव्हेंट तुमच्या न्यूज फीडमध्ये प्राधान्याने दर्शविण्यात येणार असून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ते पोहोचतील याची खबरदारी घेतली जाणार आहे. या इव्हेंटबरोबरच फोटो, पोस्ट, लिंक, स्टेटस अपडेट यासारख्या गोष्टींचीही प्रसिद्धी करता येणार आहे. यासाठी फेसबुक अमेरिकी नागरिकांकडून ७ डॉलर तर भारतीयांकडून ९९ रुपये शुल्क आकारणार आहे. हे पैसे भरण्यासाठी फेसबुकवर तुम्ही रजिस्टर केलेला मोबाइल नंबर किंवा क्रेडीट कार्ड, पे पल, वेस्टर्न युनियन क्विकपे आणि मनीबुकर्स यासारख्या माध्यमांचा उपयोग करता येणार आहे. भारतात सध्या एअरटेल आणि बीपीएलधारक मोबाइलद्वारे पेमेंट करू शकतात. 



मे महिन्यात न्यूझीलंडमध्ये या सुविधेची प्रायोगिक चाचणी झाली. यामध्ये किती व्यक्तींनी तुम्ही पोस्ट केलेला इव्हेंट पाहिला हे देखील असणार आहे. सध्या अमेरिकेत ही सुविधा लाँच झाली असून हळहळू इतर देशात ही सुविधा दिली जाईल. यापूर्वीच फेसबुकने गिफ्ट व्हाऊचर, टेडी बिअर मित्रांपर्यंत पोहोचविण्याची सशुल्क सुविधा सुरू केली आहे. त्यापाठोपाठ फेसबुकने महसूल वसुलीचा हा मार्ग निवडला आहे. ट्विटरने यापूर्वीच प्रमोटेड ट्विट्सची सुविधा देऊ केली आहे. 

प्रामुख्याने सेलिब्रिटी, मार्केटींग एजन्सी, पीआर यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यामुळे पोस्ट टाकणा-या युझरच्या सर्वच मित्रांना ते पहावे लागणार असल्याने अशा गोष्टी टाळणे आता अवघड होऊन बसेल. तसेच एखाद्याला लक्ष्य करणारे, बदनामी करणारे फोटो, पोस्ट यासाठीही यासुविधेचा वापर होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात फेसबुकला या नव्या समस्येला सामोरे जाऊ शकते. मात्र त्यापूर्वी महागाई आणि आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या जगभरातील अब्जावधी फेसबुकर्सला आणखी एका गोष्टीसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. अर्थात त्यांची इच्छा असेल तर… 
Exit mobile version