‘टॅब्लेट’ची मुसंडी, विक्री ४०० टक्क्यांनी वाढली

tab‘चालता फिरता कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणा-या ‘टॅब्लेट’नं गेल्या वर्षभरात भारतीय बाजारात जोरदार मुसंडी मारली असून या लाटेत ‘डेस्कटॉप कॉम्प्युटर’ गटांगळ्या खाताना दिसू लागलाय. २०१२-१३ या आर्थिक वर्षांत, टॅब्लेटच्या विक्रीत ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचं
मॅन्युफॅ्चरर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.



२०११-१२ या वर्षात ३.६ लाख टॅब्लेट विकले गेले होते, तर गेल्या वर्षभरात तब्बल १९ लाख टॅब्लेटची विक्री झाली आहे. मोबाइल विश्वात तर स्मार्टफोनचाच बोलबाला दिसून आलाय. एप्रिल २०१२ ते मार्च २०१३ या काळात देशात १.५ कोटी स्मार्टफोन विकले गेलेत. आधीच्या वर्षी हा आकडा ९५ लाख इतका होता. डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या विक्रीतही वाढ नोंदली गेली असली, तरी ती अवघी एका टक्का आहे.


अगदी फार लांब न जाता, दोन-तीन वर्षांपूर्वीचा काळ आठवला तरी, डेस्कटॉप कॉम्प्युटरला अनन्यसाधारण महत्त्व होतं. ‘पीसी’ खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता. लॅपटॉपमुळे डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या विक्रीवर फारसा परिणाम झाला नव्हता. परंतु, आता हा ट्रेंड झपाट्यानं बदलत चाललाय. कॉम्प्युटरच्या साम्राज्याला मोठा धक्का देण्याचं काम ‘टॅब्लेट’नं केलंय. या ‘चालत्या फिरत्या कॉम्प्युटर’ची बाजारात सॉल्लिड चलती आहे. कॉम्प्युटरवर जे काम होतं, ते सगळं टॅब्लेटवरही करता येतं. त्याशिवाय, हल्लीच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेली नानाविध अॅप्लिकेशनही ‘टॅब’वर वापरता येतात. डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या किंमती आणि टॅबच्या किमती यांची तर तुलनाच होऊ शकत नाही. अॅपलच्या ५० हजाराच्या आयपॅडपासून ते मायक्रोमॅक्स, कार्बन या देशी कंपन्यांचे ५ हजाराचे टॅब्लेटही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय मंडळीच्या हातातही आता चकाचक टॅब दिसू लागले आहेत.


स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या विश्वात भारताचा प्रवेश थोडा उशिराच झाला. पण, तरीही जागतिक ट्रेन्डशी बरोबरी करण्याच्या दिशेनं आपली घोडदौड सुरू आहे. इंटरनॅशल डेटा कॉर्पोरेशनच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये टॅब्लेटच्या विक्रीत १४३ टक्क्यांनी वाढ झालेय. त्यात भारताचं योगदानही मोठं आहे. याउलट, जगात डेस्कटॉप कॉम्प्युटरचा खप १४ टक्क्यांनी घसरलाय. भारतात अजूनही सार्वजनिक क्षेत्रातील ऑफिसं आणि सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटरचा वापर होत असल्यानं देशात कॉम्प्युटर विक्री एक टक्क्यानं वाढली आहे. पण भविष्यात ‘पीसी’चं भवितव्य कठीणच दिसतंय.

Exit mobile version