आता पब्जी मोबाइलची वेब सिरीज यूट्यूबवर उपलब्ध!

पब्जी मोबाइल या प्रसिद्ध गेम संबंधित दोस्ती का नया मैदान (मैत्रीचं नवं मैदान) नावाची नवी वेब सिरीज आजपासून उपलब्ध झाली आहे. यामध्ये छोटया शहरातील काही विद्यार्थी आणि त्यांचं दैनंदिन आयुष्य दाखवण्यात आलं आहे. याद्वारे पब्जी गेम कशाप्रकारे प्रसिद्ध होत गेली हे दर्शवण्याचा निर्मात्याचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वीच या सिरीजचा ट्रेलर सादर करण्यात आला होता. एका गेमवर आधारित वेब सिरीज तयार करून टी गेम डेव्हलपर्सच्याच चॅनलवर प्रसिद्ध केली जाण्याची बहुधा पहिलीच वेळ असावी…

यामध्ये बद्री चव्हाण, रंजन राज, चिन्मय चंद्रशुश, आलम खान आणि अर्णव भसीन या कलाकारांचा समावेश आहे. याशिवाय Rawknee व Kronten अशा काही प्रसिद्ध यूट्यूब स्ट्रीमर्सनासुद्धा यामध्ये स्थान दिलेलं आहे. या वेब सिरीजचा पहिला भाग आज यूट्यूबवर प्रसारित करण्यात आला आहे. पुढील भाग १० जानेवारी रोजी प्रसारित होईल.

पब्जीच्या चाहत्यांसाठी वेब सिरीज अशा प्रकारे मांडली जात असली तरी आपलं शहर सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात शिक्षण घेण्यासाठी हॉस्टेलवर राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्याना ही सिरीज आवडेल असं डेव्हलपर्सना वाटतं. गेममधील विविध भाग मैत्री, विद्यार्थ्यांच्या अडचणी, त्यातून काढलेला मार्ग आणि कशा प्रकारे ही PUBG Mobile गेम त्या मैत्रीला मदत करते हे दर्शवलं जाईल. ही वेब सिरीज हिंदी भाषेत असून भारतातल्या इतर भागातील प्रेक्षकांसाठी इतर भाषात सबटायटल्ससुद्धा दिलेले नाहीत.

आधीच बऱ्याचदा वादात सापडलेली ही गेम आता कॉलेजवयीन विद्यार्थी नेहमीच रिकाम्या वेळी ही गेम खेळताना दाखवलं जाणार आहे हे विद्यार्थ्यांच्या पालकांना खरच आवडेल का हा प्रश्न आहे. या गेमच्या व्यसनामुळे अनेक मुलांचा वेळ वाया जात असल्याची तक्रार अद्याप पालकांकडून केली जाते. यासाठी मित्रासारखा किंवा त्याहून भारी स्मार्टफोन हवाच असा हट्ट केला जात असल्याचंही निदर्शनास आलेलं आहे.

शिवाय गेम डेव्हलपर्सनी गेममध्ये नव्या गोष्टी आणून गेमिंग संस्कृती भारतात वाढवण्याऐवजी पुन्हा गेमिंग पेक्षा मनोरंजनावर भर दिलेलं काही चाहत्यांना आवडलेलं नाही. आता हे लक्षात घ्यावं की अशा गोष्टी करून मिळणारं आर्थिक उत्पन्न समोर ठेवावं याचा निर्णय पब्जीच्या निर्मात्याना घ्यायचा आहे. पण निर्णय काय असेल हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच…!

Exit mobile version