ब्लॅकमॅजिकचा आता 12K व्हिडिओ कॅमेरा : FullHD च्या १२ पट रेजोल्यूशन!

होय ब्लॅकमॅजिक या सिनेमा कॅमेरा बनवणाऱ्या कंपनीने आता एचडी, 2K, 4K, 6K, 8K च्याही पुढे जात 12K रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकणारा कॅमेरा सादर केला आहे! Blackmagic Ursa Mini Pro 12K या नव्या कॅमेरामध्ये 12288 x 6480 Super 35 सेन्सर असून हा कॅमेरा चक्क 12K at 60fps, 8K at 110 fps आणि 4K Super 16 at 220 fps रेकॉर्ड करू शकतो!

सध्या भारतात अद्याप 4K टीव्हीसुद्धा लोकप्रिय झाले नाहीत. तोवर तिकडे 8K टीव्ही आले आहेत आणि आता 12K कॅमेरा! अशावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुणाकडे 12K टीव्ही नसेल तर हा 12K व्हिडिओ पाहायचा कुठे? तर अशा कॅमेरामधील फुटेज हे गरजेनुसार गुणवत्ता कमी न करता क्रॉप करता येतं म्हणून एव्हढया मोठ्या रेजोल्यूशनमध्ये रेकॉर्ड केलं जातं. उदा. एका 4K व्हिडिओमधून चार वेगवेगळे एचडी भाग क्रॉप करून तयार येऊ शकतात त्याप्रमाणे कल्पना करा आता 12K मधून किती उत्तम प्रकारे व्हिडिओ क्रॉप करता येऊ शकेल. हे प्रामुख्याने सिनेमासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान असून क्वालिटी खराब न होता व्हिडिओ क्रॉप करता येणं हेच याचं वैशिष्ट्य आहे!

ब्लॅकमॅजिक कंपनी बरेच सिनेमा कॅमेरा तयार करते. शिवाय त्यांचं स्वतःचं DaVinci Resolve नावाचं 12K व्हिडिओ एडिट करू शकणारं सॉफ्टवेअरसुद्धा आता उपलब्ध आहे!

या कॅमेराची किंमत $9995 (भारतीय किंमत ₹८,७६,५००) इतकी आहे मात्र यांना सध्यातरी कुणी प्रतिस्पर्धीच नाही त्यामुळे ही जास्त किंवा कमी म्हणता येण्यासारखी किंमत नाही. कारण साहजिकच हा सहज उपलब्ध असलेला पहिलाच 12K कॅमेरा आहे!

Search Terms : Blackmagic Design Announces Blackmagic URSA Mini Pro 12K

Exit mobile version