भारत सरकारतर्फे ईस्पोर्ट्सला ‘खेळ’ म्हणून अधिकृत मान्यता!

भारत सरकारने मंगळवारी E Sports म्हणजेच ईलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्सला देशातील मुख्य क्रीडा विषयांशी जोडलं असून आता याला अधिकृतरित्या खेळाचा दर्जा मिळाला आहे. ई स्पोर्ट्स म्हणजे व्हिडिओ गेम्सची अशी मल्टीप्लेयर स्पर्धा जिच्यामध्ये अनेक ठिकाणचे गेमर्स वैयक्तिक किंवा त्यांचे संघ घेऊन सहभागी होतात.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 77 च्या कलम (3) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, ईस्पोर्ट्स नियंत्रित करणार्‍या नियमांमध्ये सुधारणा करा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाला ईस्पोर्ट्सला इतर अनेक क्रीडा प्रकारांसोबत जोडलं जावं असं सांगितलं आहे.

गेली काही वर्षं गेमिंगची लोकप्रियता भारतात मोठ्या प्रमाणात वाढली असून यूट्यूबवरील स्ट्रीम्स आणि त्यांना मिळणारं यश यामुळे गेमिंगचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आत्तापर्यंत भारतातून गेमिंग टीम्स गेमिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत होत्या मात्र त्यांना देशातर्फे पाठवण्यात आलेलं नसल्यामुळे त्यांची नोंद तशी केली जात नव्हती

मात्र आता या राष्ट्रपतींच्या नव्या आदेशामुळे यासाठी एक खास नोडल एजन्सी जी ऑनलाइन गेमिंग संबंधित गोष्टीची पाहणी करेल. शिवाय क्रीडा मंत्रालयसुद्धा याचा त्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करेल. कॉलेज पातळीवर यासंदर्भात अभ्यास क्रम सुरू करून त्यानुसार प्रशिक्षण देणं अशा गोष्टीसुद्धा होतील. अॅनिमेशन व गेमिंग क्षेत्रात लाखो नोकऱ्यासुद्धा निर्माण होत आहेत. यामध्ये कंटेंट तयार करणाऱ्यांना सुद्धा सरकार यापुढे सहकार्य करणार आहे.

भारतीय DOTA 2 संघाने ऑगस्ट महिन्यात पहिल्या कॉमनवेल्थ ईस्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत कांस्यपदक पटकावलं होतं! अशाच प्रकारच्या कामगिरीमुळे आपल्या देशातील गेमर्सनासुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करता यावं म्हणून कदाचित सरकार हा निर्णय घेण्यास तयार झालं असावं.

League of Legends World Championship 2021

इंटरनॅशनल ऑलिंपिक असोसिएशन (IOC) सुद्धा हळू हळू ई स्पोर्ट्सच्या समावेशासाठी प्रयत्न करत असून पुढच्या वर्षी जून मध्ये IOC तर्फे Olympic Esports Week जाहीर केला आहे.

बाहेरच्या देशांमध्ये गेमिंग खूपच लोकप्रिय असून ई स्पोर्ट्सच्या स्पर्धा चक्क मोठमोठ्या स्टेडियम्समध्ये भरवलेल्या असतात. यामधील बक्षिसांची संख्या सुद्धा खूप मोठी असते. इंटेल, AMD, Nvidia, एसुस अशा जगातील आघाडीच्या कंपन्यासुद्धा यामध्ये सहभागी होतात.

भारतात आजवर व्हिडिओ गेमिंगकडे टाइमपास किंवा वेळ वाया घालवण्याची गोष्ट म्हणून पाहिलं गेलं असलं तरी आता अशा निर्णयामुळे ई स्पोर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात तरी बदलेल. अर्थात प्रोफेशनल गेमिंग स्पर्धा आणि घरी वाया घालवण्यात येणारा वेळ यामध्ये नक्कीच फरक असणार आहे. मात्र ज्यांना खरंच या क्षेत्रामध्ये करियर करायचं आहे त्यांना सरकारचा हा निर्णय सुखावणारा असेल…

Exit mobile version