‘आकाश’ या टॅब्लेटचा खरेच कितपत उपयोग होऊ शकेल

अलीकडच्या काळात ‘टॅब्लेट पीसी’ किंवा ‘टॅब्लेट कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जाणा-या आकाराने छोट्या असणा-या संगणकाचे प्रस्थ बरेच वाढले आहे. अ‍ॅपल, सॅमसंग, गुगल, अ‍ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, डेल यासगळ्या प्रसिद्ध कंपन्या टॅब्लेटच्या निर्मितीमध्ये गुंतल्या आहेत. सातत्याने या टॅब्लेटच्या नवनव्या आणि अत्याधुनिक आवृत्त्या बाजारात येत राहतात. एकमेकांवर मात करण्यासाठी टॅब्लेटचा हा माराच बाजारपेठेवर सुरू असतो. लोकही या टॅब्लेटला खूप प्रतिसाद देत असल्यामुळे अ‍ॅपलचे आयपॅड, सॅमसंगचे नेक्सस, अ‍ॅमेझॉनचे किंडल फायर, गुगलचे नेक्सस अशी अनेक उत्पादने बाजारात आली, त्यांचा प्रचंड खप झाला, अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो. टॅब्लेटचे हे वेड भारतात शिरणार हे उघडच होते. पण भारतासारख्या गरीब देशामध्ये अशा प्रकारचे महाग उपकरण खपेल का आणि अशा उपकरणाचा भारतासारख्या देशाला काय उपयोग, असे दोन प्रश्न विश्लेषक उपस्थित करत होते. 2011 मध्ये मात्र भारतामध्ये प्रत्येक मुलाकडे एक लॅपटॉप असेल अशा प्रकारची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री कपिल सिब्बल यांनी केल्यामुळे हे चित्र बदलले. टॅब्लेटविषयी देशात खूप कुतूहल निर्माण झाले. त्यातूनच ‘आकाश’ नावाच्या टॅब्लेटचा जन्म झाला. त्याची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे आहे.
भारताने संगणक क्षेत्रामधल्या अत्याधुनिक उपकरणांच्या निर्मितीच्या शर्यतीत मागे राहू नये यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू केले होते. 2002 मध्ये ‘सिम्पल कॉम्प्युटर’ या शब्दांचे छोटे रूप असलेल्या ‘सिम्प्युटर’ नावाच्या स्वस्त संगणकाची निर्मिती करायचे धोरण भारताने आखले. हा संगणक म्हणजे आताच्या टॅब्लेटसारखाच हातात धरता येऊ शकेल असा छोटा आणि वजनाला हलका संगणक होता. त्यात लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर झाला. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम तसेच विंडोजवर आधारित असलेले इतर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स यांचा खर्च वाचला. महागड्या पर्सनल कॉम्प्युटर्स (पीसी) ऐवजी भारतामध्ये हा सिम्प्युटर खूप लोकप्रिय होईल, अशी आशा सरकारला वाटत होती. 

2004 मध्ये सिम्प्युटरची विक्री साधारण साडेबारा हजार रुपये किमतीला सुरू झाली. असे 50,000 सिम्प्युटरर्स विकले जातील असा अंदाज असला तरी प्रत्यक्षात फक्त 4,000 सिम्प्युटर्सची विक्री झाल्यामुळे सिम्प्युटरची संकल्पना फोल ठरली, असे मानले गेले. पण तरीही नाउमेद न होता काही वर्षांनी ‘आकाश’च्या रूपाने स्वस्तातल्या आणि आकाराने छोट्या असलेल्या संगणकाची निर्मिती भारतात करण्याचे स्वप्न नव्याने सत्यात उतरले.
‘आकाश’ हा सुरुवातीला लॅपटॉप असेल असे ठरले, पण कालांतराने त्याच्या रचनेत बदल करून तो ‘टॅब्लेट’ प्रकारचा संगणक असेल, असा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला ‘आकाश’ची किंमत साधारण 1500 रुपये असेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात ती किंमत सुमारे 2500 रुपयांवर गेली. 2011 च्या ऑक्टोबर महिन्यात या ‘आकाश’ टॅब्लेटचा नमुना लोकांसमोर सादर करण्यात आला. त्यात ब-याच उणिवा असल्यामुळे 2012 च्या एप्रिल महिन्यात त्याची सुधारित आवृत्ती सादर करण्यात आली.

 देशामधली 25,000 महाविद्यालये तसेच 400 विद्यापीठे यांना जोडण्यासाठी या टॅब्लेटचा वापर होईल, असे सरकारी लोकांनी सांगितले. या टॅब्लेटमध्ये गुगल कंपनीची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरली जाते. तिच्या मेमरीची क्षमता 256 मेगाबाइट्स असून तिच्यामध्ये 2 गीगाबाइट्सइतकी माहिती साठवता येते.

यासंदर्भात ‘आकाश’ या टॅब्लेटचा खरेच कितपत उपयोग होऊ शकेल तसेच त्यामुळे भारताच्या शिक्षण क्षेत्राला मदत होऊ शकेल का, या प्रश्नांचा आढावा घेणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेमधल्या ‘ग्लोबल अ‍ॅडव्होकसी’ नावाच्या संस्थेतर्फे ‘प्रत्येक मुलाला एक लॅपटॉप’ या संकल्पनेवर काम करणा-या काही जणांनी अत्यंत अविकसित प्रकारच्या इथिओपिया देशात एक प्रयोग केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अविकसित देशांमध्ये काही फायदा होऊ शकतो का, याचा अंदाज या लोकांना घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी इथिओपियाच्या सरकारच्या मदतीने इंग्रजी भाषेत काम करणा-या टॅब्लेट पीसीजचे वाटप काही ठरावीक भागांमधल्या चार ते अकरा वयोगटातल्या मुलांना केले. यातून मिळालेले निष्कर्ष थक्क करून सोडणारे होते. या मुलांना फक्त टॅब्लेट मिळालेले असताना आणि ते कसे वापरायचे यासंदर्भातल्या कुठल्याही सूचना मिळालेल्या नसताना या मुलांनी स्वत:च हे टॅब्लेट पीसीज कसे वापरायचे हे समजून घेतले. या मुलांना इंग्रजी भाषेचा अजिबात गंध नसताना त्यांनी खूप खटपट करून इंग्रजी भाषेतली मुळाक्षरे टॅब्लेट पीसीवरच्या एका अ‍ॅप्लिकेशनमधून शोधून काढली. तसेच हळूहळू इंग्रजी भाषेमधली अक्षरे वाचणे तसेच ती लिहिणे या गोष्टींच्या संदर्भात त्यांनी प्रगती केली. यामुळे आपण थक्क झाल्याचे मत काही अभ्यासकांनी मांडले. अविकसित तसेच विकसनशील देशांमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शालेय तसेच महाविद्यालयीन मुलांच्या शिक्षणामध्ये मोलाची भर टाकता येईल, असे मतही काही जणांनी व्यक्त केले.
कदाचित ज्या ठिकाणी पुस्तके, शिक्षक अशा प्रकारच्या गोष्टी अजिबातच उपलब्ध नसतील तशा ठिकाणी भारतातसुद्धा असे प्रयोग करून बघितले पाहिजेत. त्यातून मिळणा-या निष्कर्षांचा नीटपणे अभ्यास केला पाहिजे. भारतामध्ये ‘आकाश’सारखा टॅब्लेट खरेच एकदम स्वस्त किमतीत गरीब घरांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता आला तर त्याचा या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किती आणि कसा उपयोग होतो हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 पण त्याचबरोबर सरसकट सगळीकडेच नुसते टॅब्लेट वाटून टाकल्यामुळे आपली जबाबदारी संपली, अशा भ्रमात शिक्षण खात्याशी संबंधित असलेल्या लोकांनी राहणेसुद्धा साफ चुकीचे आहे. मुख्य शिक्षणाला पूरक साधन म्हणूनच सुरुवातीला तरी ‘आकाश’सारख्या उपकरणाकडे बघितले पाहिजे. कारण त्याच्या विद्यार्थ्यांमधल्या वापराविषयी तसेच उपयोगाविषयी ठामपणे सांगता येतील असे निष्कर्ष मिळेपर्यंत आपण त्याच्यावर विसंबून राहण्यात मोठा धोका   आहे.
याचबरोबर टॅब्लेट, लॅपटॉप, इंटरनेट, मोबाइल यांच्यासारख्या डिजिटल प्रकारच्या उपकरणांचा अगदी लहान मुलांना वापर करू देण्यामधले धोकेसुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. या उपकरणांच्या अतिवापरामुळे आणि चुकीच्या वापरामुळे अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये भयानक परिस्थिती निर्माण होत असल्याचे अनेक दाखले मिळत आहेत. 

मुलांमध्ये हिंसक वृत्ती, असमाधान, सैरभैरपणा आणि चंगळवाद या गोष्टी विलक्षण वेगाने वाढणे, कुठल्याही गोष्टीमध्ये काही मिनिटे किंवा काही वेळा तर काही सेकंद याहून जास्त वेळ लक्ष केंद्रित न करू शकण्याची समस्या, वाचन-लिखाण-चिंतन-मनन अशा महत्त्वाच्या गोष्टी न करू शकण्याची अडचण अशा अनेक गोष्टी तिथे वाढीला लागल्या आहेत. या सगळ्यांचे व्यसन सुटावे म्हणून तिथे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत आपण त्यांचे अंधानुकरण करून ‘आकाश’चे सरसकट वाटप करण्यात मोठा धोका जाणवतो. आधी यासंदर्भात भरपूर संशोधन व्हावे, खूप सर्वेक्षणे केली जावीत आणि त्यानंतरच सरकारने अशी उपकरणे विद्यार्थ्यांच्या हातामध्ये द्यावीत, असे नक्कीच म्हणावेसे वाटते!

Exit mobile version