मोबाईल इंटरनेट वापर वाढला

सायबर कॅफेत जाण्याऐवजी मोबाईलवर इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: महाविद्यालयीन युवक-युवती फेसबुक, ऑर्कुट, ट्‌विटर यासारख्या सोशल वेबसाईटवर आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. 

केवळ संवाद साधण्यासाठीच नाही, तर विविध विषयांची माहिती मिळविण्यासाठी मोबाईलवरील इंटरनेटचा वापर विद्यार्थी करत आहेत. याशिवाय, विविध खेळ (गेम्स), वॉलपेपर, थिम्स, रिंगटोन्स आणि गाणी डाऊनलोड करण्यासाठीदेखील याचा वापर होत आहे. “जीपीआरएस’ (जनरल पॉकेट रेडिओ सर्व्हिस) चालू शकणारा मोबाईल आहे, असे मोबाईलधारक इंटरनेटसाठी सायबर कॅफेचा रस्ता धरण्याऐवजी मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. यात महाविद्यालयीन युवक -युवतींसह संगणक अभियंते, अभियंते, वास्तुरचनाकार यांचा प्रामुख्याने समावेश असल्याची माहिती इंटरनेट पुरवठादार कंपन्या तसेच मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारणांमुळे ही सेवा वापरणाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत तब्बल पाच पटींनी वाढली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आतापर्यंत इंटरनेटचे स्वतंत्र कनेक्‍शन घेण्यात येत होते. आता मोबाईल संगणकाला जोडून इंटरनेटचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: लॅपटॉपधारक ई-मेल करण्यासाठी, तसेच ते फॉरवर्ड करण्यासाठी मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करतात. मात्र, मोबाईलवरील इंटरनेट वेगवान नसल्याने त्यावर काही मर्यादाही आहेत, अशी माहिती इंटरनेट सेवा पुरवठादार कंपन्यांनी दिली व सध्या तरी गतिमान सेवेसाठी स्वतंत्र कनेक्‍शनला पर्याय नसल्याचे सांगितले. मोबाईलवरील इंटरनेटचा वेग कमी असल्याने विंडो सुरू होण्यास वेळ लागतो. तसेच, मोठ्या आकाराच्या फाइल डाऊनलोड होत नाहीत किंवा डाऊनलोड होण्यास खूप वेळ लागतो. संगणकाप्रमाणे एकाच वेळेस जास्त विंडोज चालू करता येत नाहीत. ई-मेलवर सोबत मोठ्या साईजची फाइल पाठविता येत नाही, याकडे त्यानी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, मोबाईल इंटरनेटचा वापर करत असताना अनेक मर्यादा येत असल्याने त्यावर मात करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपन्यांनी वाय-फाय (WIRELESS-FIDILITY) या तंत्रज्ञानाचा मोबाईलमध्ये समावेश करण्यास सुरवात केली आहे. वाय-फाय तंत्रज्ञानामुळे मोबाईल इंटरनेटचा वेग वाढणार आहे, अशी माहिती मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Exit mobile version