ट्विटर आता भारतीय भाषांत

‘ गुगल ‘ आणि ‘ फेसबुक ‘ ने भारतीय भाषांना आपलंसं केल्यानंतर सोशल नेटवर्किंगमध्ये लोकप्रिय असलेले ‘ट्विटर ‘ ही लवकरच भारतीय भाषांमध्ये दाखल होणार आहे. सोशल मीडिया साइट्सना भारतात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘ट्विटर ‘ चे उपाध्यक्ष (इंटरनॅशनल ऑपरेशन्स) शैलेश राव यांनी ‘ मटा ‘ शी बोलताना सांगितले. 

‘ जगभर ‘ ट्विटर ‘ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकणाऱ्या प्रत्येकापर्यंत जाण्याची योजना आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काही काळात हिंदीसह ४० अन्य जागतिक भाषांमध्ये ‘ ट्विटर ‘ उपलब्ध होईल. सध्या या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. शिवाय भविष्यात ऑनलाइन जाहिरातींच्या माध्यमातून महसुली उत्पन्न मिळविण्यावरही भर देण्यात येणार आहे ,’ असे राव यांनी सांगितले. 

यापूर्वी गुगलमध्ये काम केलेल्या राव यांनी आयआयटी मुंबईच्या ‘ टेकफेस्ट ‘ मध्ये ‘ गुगल ‘ आणि ‘ ट्विटर ‘ च्या यशामागील अनेक रहस्यांचा उलगडा केला. ‘ प्रत्येकाला व्यक्त होण्याची इच्छा असते. पण , व्यक्त होण्यासाठी माध्यम मिळेलच असे नाही. एकवेळ माध्यम अथवा व्यासपीठही उपलब्ध होऊ शकेल मात्र , ते हाताळणे कठीण असू शकते. या पार्श्वभूमीवर सुलभ हाताळणी या एकमेव वैशिष्ट्याच्या जोरावर कमी कालावधीत ट्विटरने यश मिळविले ,’ असे राव म्हणाले. केवळ सुलभ हाताळणीच नव्हे तर , प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेता ट्विटरने केलेले बदल यूजरच्या चांगलेच पचनी पडले. त्याचमुळे कंपनीची घोडदौड वेगाने सुरू असल्याचेही राव यांनी नमूद केले. वैयक्तिक यूजरला व्यक्त होण्याबरोबरच अनेक चळवळींना जगभर व्याप्ती आणि प्रसिद्धी मिळवून देण्यात या मायक्रॉब्लॉगिंग साइट्ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जगभरातील एकंदर ट्रेंड पाहता विकसनशील देशांमध्ये त्यातही ब्राझील , मेक्सिको , कोरिया , ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांमध्ये ट्विटरची लोकप्रियता वाढत असल्याचेही राव यांनी स्पष्ट केले. राव यांनी उद्योगपती , ‘ महिंद्र अँड महिंद्र ‘ चे चेअरमन आणि कार्यकारी संचालक आनंद महिंद्र यांच्या ट्विट्सचेही तोंडभरून कौतुक केले. 

* हेच यशामागील गमक 
मुळातच प्रत्येक भारतीय नागरिकामध्ये व्यक्त होण्याचा नैसर्गिक गुण आहे. शिवाय देशातील चित्रपट तारे-तारका, खेळाडू , राजकारणी , उद्योगपती स्वतःहून ट्विटरवर येतात आणि आपापली भूमिका अथवा त्यांचे पर्सनल शेअरिंगही करतात. हेच ट्विटरच्या यशामागील खरे गमक आहे. 
– शैलेश राव , उपाध्यक्ष , ट्विटर 

* ट्विटर @ १४०च राहणार… 
‘ ट्विट ‘ ची मर्यादा १४० अक्षरांचीच राहणार अथवा भविष्यात त्यात वाढ करणार का , याविषयी विचारले असता १४० अक्षरे ही ‘ ट्विटर ‘ ची ओळख बनली आहे. तसेच , ट्विटर जगभरात लोकप्रिय होण्याचेही ते एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे साधारणतः एका एसएमएसइतकी असणारी ही मर्यादा वाढविण्याचा आमचा अजिबात विचार नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले. 

Exit mobile version