ऑनलाइन पेमेंट करताना घ्या काळजी अशी

ol-payएका ‘क्लिक’द्वारे सर्व व्यवहार करणे आता शक्य असले, तरीही ऑनलाइन पेमेंट करताना विशिष्ट गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. ऑनलाइन पेमेंट करण्याबाबतच्या या काही टिप्स… 

लाइट बिल, फोनचे बिल, वेगवेगळे हप्ते भरण्यासाठी हेलपाटे मारणे किंवा रांगेत थांबण्याचे दिवस आता सरले आहेत. अशी बहुतांश कामे हल्ली कम्प्युटवर एका क्लिकद्वारे होऊ लागली आहेत. अशी ऑनलाइन पेमेन्ट करणे हल्ली सोपे झाले असले, तरी या मार्गाचा वापर करताना काही काळजी घेणे आवश्यक ठरते. अन्यथा त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या, तर एखाद्या सायबर फ्रॉडचे बळी ठरून भुर्दंड बसण्याची शक्यता असते. ऑनलाइन पेमेंट पुढील तीन प्रकारे करता येईल – 

आपल्या बँकेच्या साइटवर जाऊन ज्यांना पेमेन्ट करायचे आहे, (उदा. बीएसएनएल, महावितरण किंवा मोबाइल कंपनी) त्यासाठी रजिस्टर करावे. यामध्ये आपले नियमित बिल तयार होते, तेव्हा ही माहिती आपल्या बँक अकाउंटवर दिसते. त्या वेळी ‘पे नाऊ’ (लगेच पैसे भरणे) किंवा पेमेन्ट शेड्युल (बिलाच्या मुदतीपूर्वी पैसे भरणे) असे दोन पर्याय उपलब्ध असतात. 

संबंधित विभाग किंवा संस्थांच्या साइटवर जाऊन ऑनलाइन पेमेन्टचा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि पुढील स्टेप्स फॉलो करून पेमेंट करावे. त्यामध्ये नेट बँकिंग किंवा डेबिट-क्रेडिट कार्डाद्वारे पैसे भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. 

‘ईसीएस’द्वारे दरमहा ठराविक तारखेला परस्पर बिल वळते करण्याची व्यवस्था सुरू करावी. 

हे सर्व ऑनलाईन व्यवहार करण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींकडे लक्ष द्यावे. 

नेट बँकिंग व्यवस्था सुरू करण्यापूर्वी आपला मोबाइल नंबर संबंधित सेवेसाठी रजिस्टर करावा. त्यामुळे आपल्या खात्यावरून केलेल्या व्यवहारांची तातडीने माहिती मिळेल आणि वन टाइम पासवर्ड मिळविण्यासाठीही ते आवश्यक आहे. 

ज्या नेटवर्कची तुम्हाला पूर्ण माहिती आहे, त्याच नेटवर्क किंवा कम्प्युटरवरून संबंधित व्यवहार करावेत. सायबर कॅफे किंवा सार्वजनिक कम्प्युटरचा वापर शक्यतो टाळावा. 

अगदी इमर्जन्सीसाठी सार्वजनिक कम्प्युटरचा वापर अशा व्यवहारांसाठी केला असेल, तर त्यानंतर सिक्युअर्ड नेटवर्क उपलब्ध होताच तातडीने आपला पासवर्ड बदलावा. 

संबंधित कम्प्युटरवर अँटी व्हायरस सॉफ्टवेअर अपडेटेड आहे किंवा नाही, याची खात्री करावी. 

बँकेची साइट वापरताना बँकेच्या अधिकृत लॉगइन पेजवर जाऊनच पुढील स्टेप्स पूर्ण करा. शक्यतो फेव्हरिटमध्ये लिंक स्टोअर करून ठेवू नये. 

साइट ओपन करताना तेव्हा शंका आली, तर तेथे दिसलेले सर्टिफिकेट संबंधित बँकेसाठीच इश्यू केलेले आहे का, याची खात्री करा. 

लॉगइन पासवर्ड आणि ट्रँझॅक्शन पासवर्ड वेगवेगळा ठेवा. 

ट्रँझॅक्शन पासवर्ड ठराविक कालावधीने बदलावा; तसेच काही ठिकाणी देण्यात येणारे सिक्युरीटी क्वेश्चन्स ठराविक कालावधीने बदलावेत. 

सर्व बँकांनी अशा व्यवहारांसाठी आपल्या साइटवर सिक्युरिटी टिप्स दिलेल्या असतात. असे व्यवहार करण्यापूर्वी या सर्व टिप्स काळजीपूर्वक वाचून त्या फॉलो कराव्यात. 

अशा व्यवहारांमध्ये रेफरन्स नंबर मिळतो. तो जपून ठेवावा. त्यामुळे व्यवहाराबाबत नंतर काही अडचणी आल्या, तर त्या सोडविणे सुलभ होईल. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणतीही बँक कधीही मेल किंवा फोनवर आपला पासवर्ड विचारत नाही. त्यामुळे अशा फोन किंवा मेल्सना बळी पडू नये. आपला पासवर्ड कधीही कोणालाही देऊ नये. 
——–
निरंजन फडके 
(लेखक नेट बँकिंग तंत्रज्ञ आहे)
 
Exit mobile version