भारतीय कंपनीचा पहिला किटकॅट अँड्रॉइड फोन लॉन्च :: मायक्रोमॅक्स ‘युनाइट टू’

मोटोरोलाने फक्त सात हजारामध्ये सामान्यांना परवडेल असा ‘मोटो ई’ लॉन्च केल्यानंतर मायक्रोमॅक्सनेही ‘युनाइट टू’ हा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. या फोनची दोन वैशिष्ट्ये म्हणजे भारतीय कंपनीचा हा पहिला अॅन्ड्रॉइड ४.४.२ किटकॅट फोन आहे. तसेच या फोनमध्ये एकूण २१ भारतीय भाषा असल्याने याला ख-या अर्थाने भारतीय फोन म्हणता येईल.
मायक्रोमॅक्स ‘युनाइट टू’मध्ये इंग्रजी शिवाय हिंदी, मराठी, संस्कृत, कोकणी, पंजाबी, गुजराती, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड, उडिया, बंगाली, आसामी, नेपाळी, बोडो, डोगरी, काश्मीरी, मैथिली, मणिपुरी आणि सिंधी या भाषांचा समावेश आहे. 

                ‘युनाइट टू’ हा ड्यूएल सिम फोन आहे. मोबाईलची स्क्रीन ४.७ इंच ग्राफ आयपीएस डिस्प्लेसहीत ४८०x ८०० रेझ्युलेशन असणारी आहे. या फोनमध्ये १.३ गिगाहर्ट्झ क्वॉड-कोर प्रोसेसर असून इंटर्नल एक जिबी रॅम आहे. मायक्रोमॅक्सने पहिल्यांदाच स्मार्टफोनमध्ये गुगलची सर्वात नवीन अॅन्ड्रॉइड ४.४.२ किटकॅट ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली आहे. तसेच ओटीएद्वारे (ओव्हर द इयर) ही ओएस अपडेट करुन देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे. 

              युनाइट टूमध्ये ५ मेगापिक्सल ऑटोफोकर कॅमराबरोबरच एलईडी फ्लॅशचीही सुविधा देण्यात आली आहे. २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम आहे. ४ जिबी इंटर्नल स्टोरेज असून गरजेनुसार ही मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवता येते. मोबाईलची बॅटरी २००० एमएएचची आहे. कनेक्टीव्हीटीसाठी थ्री जी, ब्लुटूथ, वायफाय आणि जीपीएसचे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन ग्रे, हिरवा, लाल आणि सफेद रंगामध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये एमएडी, गेटइट, गेम्स क्लब, हाइक, एम गेम्स, किंगसॉफ्ट ऑफिस, एम लाइव्ह आणि ओपरा मिनीसारखे प्रिलोडेड अॅप्लिकेशन दिले आहेत.

Exit mobile version