गूगल कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) साठी मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी येत्या काही वर्षांत तब्बल 15 अब्ज डॉलर्स (सुमारे 1.25 लाख कोटी रुपये) खर्च करून नवे AI हब उभारणार आहे. अमेरिकेबाहेरची गूगलची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. हा प्रकल्प भारतातील पहिला “गिगावॅट स्केल” डेटा सेंटर कॅम्पस ठरणार आहे.
काय आहे गुगलची योजना?
गुगल विशाखापट्टणममध्ये एक जागतिक दर्जाचे AI हब तयार करणार आहे. हे केंद्र फक्त एक ऑफिस नसेल, तर ते एक असे ठिकाण असेल जिथे AI संबंधित संशोधन (Research), विकास (Development) आणि नवनवीन तंत्रज्ञान तयार करण्याचे काम केले जाईल. या हबमुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट आणि AI तज्ञांसाठी हजारो नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील.
विशाखापट्टणमची निवड का?
विशाखापट्टणमची निवड अनेक महत्त्वाच्या कारणांमुळे करण्यात आली आहे:
- समुद्रकिनारी असलेले स्थान: शहराला समुद्रकिनारा लाभल्यामुळे डेटा सेंटर आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ते सोयीचे आहे.
- तंत्रज्ञानासाठी अनुकूल वातावरण: आंध्र प्रदेश सरकारने तंत्रज्ञान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
- कुशल मनुष्यबळ: या परिसरात मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग कॉलेज आणि तांत्रिक शिक्षण संस्था आहेत, ज्यामुळे कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल.
भारताला काय फायदा होणार?
- रोजगार निर्मिती: मोठ्या प्रमाणात तरुणांना उच्च पगाराच्या नोकऱ्या मिळतील.
- तंत्रज्ञानात प्रगती: भारत AI तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक बनेल.
- आर्थिक विकास: या गुंतवणुकीमुळे स्थानिक आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल.
आजच्या काळात डेटा सेंटरचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे. AI मॉडेल्स, क्लाऊड सेवा आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्ससाठी प्रचंड प्रमाणात संगणकीय शक्ती आणि जलद कनेक्टिव्हिटीची गरज भासते. त्यामुळे अनेक कंपन्या स्थानिक पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करत आहेत, ज्यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि सक्षम होऊ शकते.
हा प्रकल्प २०२६ ते २०३० या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जाणार असून, यामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ही माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री एन राम मोहन नायडू यांनी नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना दिली.

Thomas Kurian, जे Google Cloud चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, यांनी सांगितले की कंपनी डेटा सेंटरला मल्टी-गिगावॅट क्षमतेपर्यंत वाढवणार आहे. “हे आमच्या जागतिक डेटा सेंटर नेटवर्कचा एक भाग आहे. आम्ही विशाखापट्टणमला ग्लोबल कनेक्टिव्हिटी हब बनवणार आहोत. यासाठी आमचे सागरी केबल नेटवर्क देखील येथे आणले जाईल आणि ते इतर ठिकाणांशी जोडले जाईल,” असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी अदानी ConneX आणि एयरटेलसोबत भागीदारी केली आहे.
तज्ञांचे म्हणणे आहे की, या गुंतवणुकीमुळे केवळ आंध्र प्रदेशच नव्हे तर संपूर्ण भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख मिळेल. AI तंत्रज्ञान, रोबोटिक्स, डेटा विश्लेषण आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेश राज्य अलीकडच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने पुढे येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत, विशेषतः महाराष्ट्रा राज्याच्या तुलनेत, आंध्र प्रदेशने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांत माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डेटा सेंटर क्षेत्रात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यात Google चा AI हब हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. याउलट महाराष्ट्रात देखील तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत असली तरी, आंध्र प्रदेशने धोरणांचा वेग, प्रोत्साहने आणि गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या सुविधा यामुळे अधिक गतीने प्रगती साधली आहे.