सोशल मीडियाबद्दल महत्वाची सूचना

■ सोशल मीडियाबद्दल महत्वाची सूचना (टीप : संपूर्ण लेख अवश्य वाचावा ही विनंती )
– टिम MarathiTech तर्फे जनहितार्थ प्रसारित

हल्ली फेसबुक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडियावरून ज्या गोष्टी पोस्ट/सेंड केल्या जातात त्यामध्ये बर्‍यापैकी असत्य गोष्टी जास्त असतात. उगीच आपल्याला कोणीतरी पाठवली आहे किंवा कुठल्या तरी पेजवर ती माहिती वाचली आहे म्हणून ती माहिती खरी असेलच असे नाही ! कोणी एखाद्या राजकीय नेत्याने कधीच उल्लेख न केलेले वाक्य त्याच्या नावावर सोबत चित्र जोडून खपवतो, कोणी नुकत्याच घडलेल्या काही घडामोडीमध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यक्तीच्या नावावर फेक प्रोफाइल उघडून काहीही पोस्ट करून गोंधळ उडवून देतो, कोणी सध्याच्या चित्रपट/अभिनेता/अभिनेत्री यांच्या नावावर काहीही पोस्ट पसरवतो (ज्याचा उद्देश मुख्यतः जातीय/धार्मिक तेढ निर्माण करणे हा असतो). या मेसेजेसना Hoax (अफवा) म्हणतात

☛ एक प्रामाणिक आवाहन :
● सोशल मीडियावर (फेसबुक, व्हाट्सअॅप,इ.) पोस्ट केल्या जाणार्‍या सर्वच गोष्टी खर्‍या मानू नयेत.
● स्वतः त्या पोस्टची सत्यता तपासल्याशिवाय इतर कुठे शेअर करू नये!.
● अमुक एका व्यक्तीने काही विधान केलं आहे हयाबद्दल खात्री करून मगच मत मांडावं.
● जर आपल्या लक्षात आले की आपण शेअर केलेली पोस्ट नकली/खोटी/असत्य आहे तर तसे शेअर केलेल्या ठिकाणी जाऊन नक्की सांगा! (त्यामुळे खोट्या बातम्या आणखी पसरत जाणार नाहीत)
● व्हाट्सअॅपवर गुड मॉर्निंगच्या मेसेजसाठी काही तरुणींचे फोटो आलेले पाहिले असतील तेसुद्धा अगदी कोणत्याही तरुणीचे फेसबुक प्रोफाइल पिक्चर त्यांच्या परवानगीशिवाय वापरुन अक्षरशः बदनामी केली जाते (विचार करा जर उद्या आपल्या नातेवाईकांसोबत असा प्रसंग घडला तर आवडेल आपल्याला….??!!!!)
● एखादी पोस्ट शेअर करताना ज्याच्याकडून कॉपी पेस्ट करत आहात त्याचे खाली नाव लिहा पोस्टबद्दल क्रेडिट द्या. (काही महाभाग एकच पोस्ट वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची म्हणून टाकत राहतात!)
● सत्यता तपासण्यासाठी विकिपीडिया, गूगल, प्रसिद्ध न्यूज वेबसाइट यांचा आधार घ्यावा.
● एखाद्या स्टारची प्रोफाइल खरीच आहे का तपासण्यासाठी त्यांच्या नावासमोर निळ्या रंगाची बरोबर चिन्ह (✔) आहे का पहा (केवळ याच प्रोफाइल ऑफिशियल असतात).
● काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा किंवा न्यूजपेपर/ चॅनलयांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधा.

अशी काही खोट्या पोस्ट्सची उदाहरणे : (टीप: खालील सर्व उदाहरणे कुठेतरी तुम्ही वाचली असतील आणि ती १००% खोटी आहेत ! ☜)
✕ तीन डोक्याच्या सापाचा फोटो, ✕ भारतीय राष्ट्रगीत सर्वोत्तम असल्याचा दावा ✕ एका स्त्रीने ११ बालकांना एकाच वेळी जन्म दिलाय ✕ एका सापाने अख्खा मनुष्य गिळला आहे ✕ नासाचा दिवाळीमधील फोटो ✕ कुरकूरेमध्ये प्लॅस्टिक ✕ कॉनटॅक्ट लेन्स गरम होऊन विरघळतात ✕ पार्ले बिस्किटवरील मुलगी मोठी झाली ✕ पंतप्रधान मोदींनी अमुक एक अॅप भारतीय आहे म्हणून तेच वापरा म्हणणं किंवा दिवाळीत चीनी दिवे लावू नका म्हणणं ✕ Telegram अॅप भारतीय आहे म्हणणं ✕ नासा/ मायक्रोसॉफ्टमध्ये अमुक टक्के लोक भारतीय आहेत ✕ ओबामा तेंडुलकरची मॅच बघायचे ✕ अमुक नेत्यांची स्विस बँकेत अमुक संपत्ती आहे ✕ झाडामध्ये/ढगामध्ये भारताचा नकाशा ✕ व्हाट्सअॅप CEO चा ब्लु टिक विषयी मेसेज ✕ हनुमानाची गदा सापडली इ. सर्व पोस्ट्स साफ खोट्या आहेत !!!

ठराविक कलाकाराबद्दल, हल्ली आलेल्या चित्रपटाबद्दल किंवा चित्रपटाच्या कमाईचा हिस्सा शेतकर्‍यांना देण्याचा मुद्दा असेल किंवा “नाम फाऊंडेशन” बद्दल असेल ज्यामध्ये आपल्या आवडत्या कलाकाराने जरी मदत केली नसेल तरी त्याने ती केली म्हणून पसरवतात आणि मग त्या स्टारला त्यावर स्पष्टीकरण देत बसावं लागतं ! किंवा काही मोठ्या नेते/ सेलेब्रिटी यांचे फोटो फॉटोशॉपमध्ये एडिट करून त्यावरून तेढ निर्माण करायची किंवा एखाद्या स्टारचं जिवंत असतानाच निधन झालंय म्हणूनसुद्धा पोस्ट्स बनवल्या जातात म्हणजे किती कळस झाला आहे याचा अंदाज तुम्हाला येईल.
ह्यामध्ये प्रसिद्ध फेसबुक पेजेसचा मोठा हात असतो कारण हजारो-लाखो लोकांनी पेज लाइक केलेलं असतं आणि त्यामुळे ती पोस्ट खरी असो किंवा खोटी ती त्या सर्वांपर्यंत जातेच (जे एका चांगल्या सामाजिक वातावरणासाठी निश्चितच घातक आहे). याबद्दल अलीकडेच घडलेली अनेक उदाहरणे सांगता येतील. पण नंतर कधीतरी याविषयी सविस्तर लेख लिहू …

आपल्या मित्रांनाही सांगा शक्य असेल तिथे शेअर करायला आणि त्यांनाही पटवून द्या पोस्टची सत्यता तपासून पाहणं किती महत्वाचं आहे ते !
कृपया ही पोस्ट मात्र नक्की सर्वांपर्यंत पोचवा !

शेअर करण्यासाठी लिंक :
#Marathi #MarathiTech #Facebook #WhatsApp

Exit mobile version