एसबीआय बँकेकडून जुने मॅगस्ट्रिप कार्ड मोफत बदलून मिळणार!

मॅग्नेटिक पट्टी असणाऱ्या डेबिट कार्ड वापरण्यात असणारे धोके लक्षात घेता जुने कार्ड बदलून EMV चिप असणारे कार्ड घेण्याचे आवाहन SBI (तसेच अन्य बँका) तर्फे करण्यात आले आहे. खरेतर RBI आदेशामुळे हल्ली नव्या खातेधारकांना फक्त EMV चिप असणारे कार्ड मिळत असले तरी अनेकांचे जुने कार्ड असल्याकारणाने सुरक्षेच्या कारणास्तव ते बदलून घेणे गरजेचे आहे. SBI द्वारे ट्विट करून याबद्दल सांगण्यात आले असून EMV चिप असणारे कार्ड विनामूल्य बॅंकेत जाऊन किंवा इंटरनेट बँकिंग च्या माध्यमातून अर्ज करून घेऊ शकता. यासाठी शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१८!

वापरण्याचे फायदे
मॅग्नेटिक पट्टी असणाऱ्या मॅगस्ट्रिप कार्ड्सपासून बनावट कार्ड तयार करून फसवणूक केली जाते त्यामुळे EMV चिप असणारे कार्ड यापासून सुरक्षित ठेवतात. पॉईंट ऑफ सेल द्वारे वापरताना ट्रांजेक्शन मेसेज साठी पाठविलेल्या डेटाचा वापर करून बनावट चिप करता येत नाही तसेच या माहितीचा सुद्धा वापर पुन्हा ट्रांजेक्शन साठी करता येत नसल्यामुळे सुरक्षेत भर पडते. तुमचे कार्ड हरवले/चोरीस गेल्यास PIN शिवाय ते वापरता येत नाही.

Europay, MasterCard, Visa यांनी विकसित केल्यामुळे याला EMV चिप म्हणून संबोधले जाते. जुन्या कार्ड सारखेच चिप आधारित कार्ड आपण वापरू शकता. यामध्ये कोणताही बदल होणार नाही मग ते पॉईंट ऑफ सेल, ATM किंवा ऑनलाईन व्यवहार करताना असेल.

चिप कार्ड कसे ओळखणार ?
जर तुमचे कार्ड EMV चिप कार्ड असेल तर कार्ड च्या पुढील बाजूस एक मायक्रोचिप बसविलेली असेल. आपणाकडे EMV चिप आधारित कार्डऐवजी कोणत्याही बँकेचे मॅग्नेटिक पट्टी असणारे कार्ड असल्यास तुम्ही ते तुमच्या बँकेतून सहजपणे बदलून घेऊ शकता जेणेकरून तुमचे व्यवहार सुरक्षित राहतील.

अधिकृत माहिती : Information for SBI Magstripe Debit Cardholders

Exit mobile version