अॅपल आयफोन्सची विक्री घटतेय…!

आयफोन्सची विक्री अॅपलच्या अपेक्षेपेक्षा कमी, मुख्य कारण चीनमध्ये कमी झालेली मागणी!

आज आलेल्या माहितीनुसार अॅपलच्या आयफोन्स विक्री अपेक्षेपेक्षा कमी झालेली असून मागणीसुद्धा खालावली असल्याच चित्र दिसत आहे. यामागे प्रामुख्याने चीनमधील ग्राहकांनी आयफोन्सकडे फिरवलेली पाठ म्हणता येईल. काही वर्षापूर्वी असलेली चीनी मार्केटमध्ये मागणी आता होताना दिसत नसून नव्या आयफोनला यामुळे फटका बसला आहे पर्यायाने अॅपलचं गेल्या चार महिन्यातलं उत्पन्न खालावलं आहे. आज या प्रकारामुळे अॅपलचं बरच नुकसान झालं असून जगभरात शेअर बाजारामध्ये याचे परिणाम पाहायला मिळत आहेत!

ही बातमी बाहेर पडताच अॅपल शेअर तब्बल दहा टक्क्यांनी कोसळले असून २०१३ नंतर प्रथच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या किंमतीत घसरण झाली आहे! कंपनीच्या मार्केट वॅल्यू $74.6 billion डॉलर्सने कमी झाली आहे! काही महिन्यांपूर्वीच अॅपलने 1 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट वॅल्यूला स्पर्श करणारी पहिली कंपनी बनण्याचा बहुमान मिळवला होता.

अॅपलच्या आयफोन विक्रीच्या घसरणीमागे चीनमधल्या कमी प्रतिसादाचा मोठा हात मानता येईल. अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल ट्रेड वॉर त्यात अमेरिकेत चिनी कंपन्यांना विक्रीस घातले जात असलेले निर्बंध अशा गोष्टींचाही थोडाफार परिणाम जाणवतो आहे. त्यात आयफोन्सच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. अमेरिकेतच त्यांचे फोन्स $1000 च्या पुढे मिळतात. त्यामुळे उर्वरित देशात ते पोहोचेपर्यंत फारच महाग झालेले असतात. तरीही केवळ अॅपलचा फोन आपल्याकडे हवा या उद्देशाने अनेकजण अधिकचे पैसे मोजून आयफोन्स घेण्यास तयार असतात. पण किंमत अतिच वाढलेली दिसत असल्यामुळे नव्या आयफोनऐवजी जुनाच नवी बॅटरी टाकून वापरण्यात काही ग्राहकांचा ओढा पाहायला मिळतोय. पर्यायाने नवा आयफोन घेण्याच प्रमाण कमी होताना दिसत आहे.

एकंदरीत अशा घसरत चाललेल्या एकूण विक्रीमुळे अशीही चर्चा सुरू झाली आहे की आता स्मार्टफोन्स इंडस्ट्री अशा वळणावर आहे की येथून जवळपास प्रत्येकाकडे फोन्स आहेत आणि फारसं नवं तंत्रज्ञान येत नसल्यामुळे अपग्रेड करून नवा फोन घेण्याच प्रमाणही खालावलं आहे आणि यामुळे आता स्मार्टफोन विश्वात सर्वच कंपन्यांना अशा अडचणी येऊ शकतात! २०१० पासून प्रचंड वेगात असलेलं हे मार्केट आता काहीसं हळू वेगात धावताना दिसत आहे. अर्थात एकदम खाली येण्याची लगेचच शक्यता नसली तरी कंपन्यांना याबद्दलचा धोका समजेल एव्हढ्या पातळीवर तर नक्कीच ही इंडस्ट्री उभी आहे.

Exit mobile version