गूगल प्ले स्टोअरवर UPI पेमेंट उपलब्ध! : ऑगस्टमध्ये UPI व्यवहारांत ११.६% वाढ!

गूगलने भारतात त्यांच्या गूगल प्ले स्टोअरवर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) हा नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे युजर्सना अॅप्स, गेम्स, पुस्तके, चित्रपट खरेदी करण्यासाठी UPI चा वापर करता येणार आहे. UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी आपण BHIM, Google Pay, Paytm, PhonePe अशा कोणत्याही अॅपचा वापर करू शकाल.

हा पर्याय काही यूजर्सना गेल्या काही आठवड्यापासून दिसण्यास सुरुवात झाली होती मात्र गूगलने आता यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून आता डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग सोबत यूपीआय हा नवा पर्याय उपलब्ध झालेला पाहायला मिळेल.

युजर्सना यासाठी गूगल प्ले स्टोअरच्या सेटिंग्समध्ये जाऊन त्यांचा UPI ID (VPA) लिंक करायचा आहे जेणेकरून तिथून पुढे कधीही पेमेंट करणं सोपं जाईल.

गूगल प्ले रिटेल अँड पेमेंट्स विभागाचे प्रमुख सौरभ अगरवाल यांनी अशी माहिती दिली की “भारतीय अॅप डेव्हलपर्स सध्या वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम अॅप्स तयार करून त्यामार्फत चांगला व्यवसाय करत आहेत आणि आम्ही त्यांना मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” यासाठी एक मार्ग म्हणजे युजर्सना अॅप, गेम्स खरेदी करण्यासाठी सोपे पेमेंट पर्याय उपलब्ध करून देणं असून Credit Cards, Debit Cards, Carrier Billing (थेट सीम कार्ड बॅलन्सद्वारे खरेदी) व गिफ्ट कार्ड हे पर्याय आधीपासून आहेत. आता यामध्ये UPI जोडल्यामुळे पेड अॅप्स, गेम्स, अॅप्स मध्ये उपलब्ध पेड कंटेंट यासाठी पैसे देणं सोपं होईल.

UPI द्वारे पेमेंट्सची भारतात प्रचंड वेगाने वाढ

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) पर्याय उपलब्ध झाल्यापासून देशभरात सर्वत्र याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून आता सर्व दुकाने, हॉटेल्स, मॉल अशा सर्वच ठिकाणी UPI साठी लावलेले QR कोड्स पाहायला मिळतात. फोनपे याबाबत अलीकडे पुढाकार घेऊन सर्वच अॅप्सना पेमेंट करता येईल असा QR कोड बऱ्याच ठिकाणी लावला आहे. BHIM, Google Pay, Paytm, PhonePe, Amazon Pay UPI व बँकांचे स्वतःचे UPI अॅप्स असे अनेक अॅप्स एकाच UPI प्लॅटफॉर्मद्वारे पैसे देवाण घेवाण करण्यासाठी सहजसोपे पर्याय ठरत आहेत.

ऑगस्ट महिन्यात प्रथमच UPI पेमेंट्सनी ९० कोटी व्यवहार ज्यांची किंमत तब्बल १.५४ लाख कोटी असेल इतके व्यवहार पार पाडले आहेत! जुलै महिन्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल ११.६% अधिक होती! किंमतीच्या दृष्टीने पाहता ५.५% टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. छोट्या शहरांमध्ये वाढलेला स्मार्टफोन्स व इंटरनेटचा वापर UPI च्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच अशा अॅप्सद्वारे अनेकदा कॅशबॅकसुद्धा दिला जातो त्यामुळे तर याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे! UPI मध्ये सध्या १४१ बँका सहभागी आहेत.

Exit mobile version