आता टिकटॉकवर EduTok मार्फत ई लर्निंग : शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळणार!

अलीकडे बऱ्याच कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या टिकटॉकवर आता शैक्षणिक व्हिडिओसुद्धा उपलब्ध होणार आहेत. टिकटॉक या व्हिडिओ शेयरिंग अॅपमध्ये उपलब्ध होणाऱ्या व्हिडिओची बऱ्याचदा चेष्टा सुद्धा केली जाते. मात्र हे असलं तरी या अॅपची लोकप्रियता सुद्धा फार मोठी आहे. म्हणून आता नेहमीच्या मनोरंजनात्मक व्हिडिओसोबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ खास भागीदारी करून सुरू केले आहेत. आता या अंतर्गत EdutTok सुरू होत असून याद्वारे भाषा शिकणे, फिटनेस, मोटिवेशनल या संबंधी व्हिडिओ पहायला मिळतील!

टिकटॉकची मालकी असणाऱ्या बाइटडान्स (ByteDance) कंपनीने या नव्या EduTok मुळे भारतातील ई लर्निंग क्षेत्रात क्रांती घडेल असा दावा केला आहे. इंग्लिश स्पीकिंग, न्यूट्रिशन, फिटनेस, टिप्स अँड ट्रिक्स अशा विषयांना अनुसरून छोटे व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील. यासाठी त्यांनी Toppr, Made Easy, Gradeup यांच्या सारख्या ई लर्निंग तयार करणाऱ्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. लवकरच Vedantu, VidyaGuru, Hello English आणि CETKing हे सुद्धा उपलब्ध होतील. JoshTalks वरील व्हिडिओसुद्धा EduTok अंतर्गत समाविष्ट केले जाणार आहेत. शिवाय याद्वारे ५००० क्रिएटर्सना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सध्याच्या मनोरंजनात्मक व्हिडिओसोबत असे व्हिडिओ सादर करून बाइटडान्स ही चीनी कंपनी टिकटॉक मार्फत पसरणाऱ्या वाईट/चुकीच्या/खोट्या कंटेंटमुळे झालेली प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात आहे हे दिसून येतं. आता सुरू झाल्या झाल्या #EduTok चा वापर करणारे १ कोटी व्हिडिओ टिकटॉकवर उपलब्ध आहेत आणि यांना ४८०० कोटी व्ह्यूज आहेत.

https://www.tiktok.com/tag/edutok

सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामधील आंदोलकांचे व्हिडिओ, अकाऊंट सेन्सॉर केल्याबद्दल टिकटॉक वादात सापडलं आहे. कालच मार्क झकरबर्गनेही यावर टीका केली आहे! अशावेळी EduTok सारख्या गोष्टीमुळे टिकटॉकची प्रतिमा किती सुधारेल आणि याचा खरोखर किती युजर्सना फायदा होईल ते येत्या काळात समजेलच…

Exit mobile version