वर्ल्ड वाइड वेबच्या निर्मात्याची इंटरनेटच्या सुरक्षिततेसाठी योजना!

टीम बर्नर्स-ली यांनी १९८९ मध्ये वर्ल्ड वाइड वेब तयार केलं होतं. गेली कित्येक वर्षे इंटरनेटच्या वाढीसाठी प्रयत्न केल्यानंतर आता त्यांनी इंटरनेटच्या सुरक्षितते, इंटरनेटला वाचवण्यासाठी सर्वांना एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज वारंवार व्यक्त केली आहे. इंटरनेटमधील अडचणी दूर करून डिजिटल डिस्टोपिया (मोठ्या वाईट घटना घडून गेलेली जागा) होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी आता कॉंट्रॅक्ट फॉर द वेब सादर केले असून यामध्ये एक नियमावली मांडण्यात आली आहे. या नियमावलीत सरकारी संस्था, कंपन्या आणि व्यक्ती यांनी पालन केले पाहिजेत असे ९ नियम असून त्याद्वारे सामाजिक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून सर्वांना स्वस्त, विश्वासू इंटरनेट पुरवण्यासंबंधी जबाबदारीचीही माहिती देण्यात आली आहे.

सादर झाल्या वेळी या कॉंट्रॅक्टला १५० हून अधिक कंपन्यानी संमती दिली असून मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या जसे की मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबुक, ट्विटर, रेडिट, डकडकगो यांची नावे आहेत. अलीकडे याच मोठ्या कंपन्याना युजर्सच्या माहितीच्या केल्या जाणाऱ्या वापराबद्दल मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. कॉंट्रॅक्ट ऑफ द वेब मध्ये याबद्दल खास नियम असून त्यानुसार सर्वानी यूजर्सच्या माहितीचा गैरवापर करू नये आणि ग्राहकांच्या माहिती आणि खासगी माहितीच्या गोपनियतेची काळजी घ्यावी. जर एखाद्या कंपनीने त्यानुसार काम केलं नाही असं दिसून आलं तर त्या कंपनीला या सपोर्टर्सच्या यादीतून काढून टाकण्यात येईल.

या कॉंट्रॅक्टमध्ये ७२ कलमे असून नऊ तत्वांचा/नियमांचा समावेश आहे. येणाऱ्या काळात घडणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन पुढील प्रवास ठरवण्यात आला आहे. या कॉंट्रॅक्ट बद्दल जर्मनी, फ्रान्स आणि घाना या देशांनी संमती दर्शवली आहे. या कॉंट्रॅक्टमधील माहितीनुसार सरकारी संस्थानी प्रत्येक व्यक्तीला पूर्ण वेळ इंटरनेट वापरता येईल या संबंधित काळजी घ्यावी असंही नमूद आहे.

अधिकृत माहिती : https://contractfortheweb.org/

Exit mobile version