शायोमी स्मार्टफोन विक्रीत पुन्हा आघाडीवर : सॅमसंगची घसरण सुरूच!

IDC (इंटरनॅशनल डेटा कार्पोरेशन) ही संस्था टेक्नॉलॉजी, टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातल्या घडामोडींवर लक्ष ठेऊन असते. त्यांनी जाहीर केलेल्या भारतीय स्मार्टफोन बाजाराच्या सद्यस्थितीबद्दलच्या माहितीनुसार शायोमी अजूनही पहिल्या स्थानी कायम असून सॅमसंग दुसऱ्या ठिकाणी आहे. मात्र सॅमसंगची कमी होत असलेली विक्री लक्षात घेता सॅमसंग आणखी खाली घसरण्याची चिन्हे आहेत. टॉप ५ पैकी सॅमसंग एकटीच अशी कंपनी आहे जिचा मार्केटमधील हिस्सा कमी झाला आहे! गेल्यावर्षी २२.६ टक्के असलेला हिस्सा आता १८.९ टक्के झाला आहे. शिवाय शिपमेंट्सची गेलीवर्षीच्या तुलनेत या काळामध्ये ८.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.

शायोमीच्या मार्केट शेयरमध्ये ०.२ टक्क्यांची थोडीशीच का होईना घट झाली आहे. रियलमी, ओप्पो, आणि विवो यांच्यात मात्र मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. रियलमीची यंदा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत असून गेल्यावर्षीच्या या चौमाहीत १३ लाख शिपमेंट्सपासून २०१९ च्या या चौमाहीत तब्बल ६७ लाख फोन्सची शिपमेंट रियलमीने केली आहे! यांचा बाजारातला हिस्सा ३.१ टक्क्यावरून थेट १४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे! ओप्पो आणि विवोच्या शिपमेंट्समध्ये अनुक्रमे ९२.३ आणि ५८.७ टक्के वाढ झाली आहे!

सॅमसंगची घसरण सुरू असली तरी त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे M मालिकेतील प्रचंड लोकप्रिय ठरलेला Galaxy M30s फोन.

भारतातील टॉप ५ फोन्सपैकी चार फोन्स शायोमीचेच असून Redmi 7A आणि Redmi Note 7 Pro यांची यामध्ये आघाडी आहे. Redmi K20 मालिकेला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. ओप्पोच्या A5s ने पाचवं स्थान मिळवलं आहे.

ओप्पो, रियलमी, विवो आणि वनप्लस या सर्व कंपन्या BBK Electronics च्या अधिपत्याखाली असल्याने या एकाच कंपनीकडे भारतीय स्मार्टफोन बाजाराचा ४० टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे! लवकरच रियलमी सॅमसंगला मागे टाकून दुसऱ्या स्थानी जाऊ शकते.

Exit mobile version