FASTag ची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवली : काय आहे फास्टॅग?

टोल भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी आणि टोल प्लाझावर गर्दी वाढत जाऊ नये या उद्देशाने तयार केलेला फास्टॅग ला आता १५ डिसेंबरपासून सर्व चारचाकी वाहनांना अनिवार्य करण्यात येणार आहे. देशभरातील जवळपास ५२५ टोल प्लाझावर हा फास्टॅग वापरता येईल. यामुळे सर्व चारचाकी वाहनांना फास्टॅगचे RFID स्टीकर्स लावावेच लागतील. या आधी ही मुदत १ डिसेंबरपर्यंतच होती मात्र आता ती १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदतीनंतर ज्या वाहनांनी फास्टॅग लावून घेतला नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल जो त्यांना दंड स्वरूपात आकारलेला असेल.

फास्टॅग म्हणजे काय ? (What is FASTag?)

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) यांनी इलेक्ट्रोनिक टोल जमा करण्याची प्रक्रिया फास्टॅग मार्फत २०१४ मध्ये अंमलात आणली. सर्वात आधी दिल्ली मुंबई मध्ये उपलब्ध झालेला फास्टॅग नंतर चार मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर हा सुरू करण्यात आला. टोल प्लाझावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया ऑटोमॅटिक/स्वयंचलित करून वेळ वाचावा, टोल प्लाझावरील लांबच लांब रांगा लागू नयेत हा फास्टॅगमागचा मूळ उद्देश. फास्टॅगसाठी आपल्या गाडीच्या काचेवर एक RFID चिप बसवण्यात येते. फास्टॅग असलेल्या टोल प्लाझावर सेन्सर्सद्वारे तो फास्टॅग स्कॅन केला जातो आणि जे काही टोल असेल तो वाहन चालकाच्या फास्टॅग अकाऊंटमधून आपोआप भरला जातो. यामुळे टोल प्लाझावर थांबायची गरज नाही सर्व प्रक्रिया आपोआप होईल.

  1. आपल्या वाहनासाठी फास्टॅग स्टीकर खरेदी करा आणि वाहनाच्या काचेवर बसवून घ्या (फास्टॅगची किंमत एकूण ४००-५०० दरम्यान असेल)
  2. फास्टॅग अकाऊंट वॉलेट मध्ये पैसे जमा करा (जर त्या वॉलेटमधील पैसे संपले असतील तर तुम्हाला आधी रीचार्ज करावं लागेल). फास्टॅग अकाऊंट वॉलेट थोडक्यात सिम कार्ड प्रमाणे आहे असं समजा. बॅलन्स असेल तोवर वापरता येईल.
  3. फास्टॅग सुविधा असलेल्या टोल प्लाझावरून जाता वेग कमी ठेवा आणि फास्टॅगचा लोगो असलेल्या स्वतंत्र लेन मधूनच जा
  4. तुमच्या फास्टॅग अकाऊंट वॉलेटमधून ठरलेली टोल रक्कम आपोआप कापून घेतली जाईल. या प्रक्रियेदरम्यान तुम्हाला वाहन थांबवण्याची गरज नाही. सर्व प्रक्रिया आपोआप पार पाडली जाईल आणि तुम्ही लगेच पुढे प्रवास सुरू ठेऊ शकाल!

फास्टॅग कुठे आणि कसा घ्यायचा?

फास्टॅगची सेवा आता अॅक्सिस बँक, HDFC बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया अशा एकूण २२ बँकांद्वारे उपलब्ध आहे. बँक, टोल प्लाझा, Amazon, Paytm या ठिकाणी फास्टॅग खरेदी करता येईल! एक फास्टॅग खरेदी केल्यावर तो पाच वर्षांसाठी वैध असेल. पाच वर्षं तुम्हाला NHAI वॉलेट रीचार्ज करत करत वापरायच आहे. हे वॉलेट तुमच्या बँक अकाऊंटला लिंक केलं जाईल. तुमच्या वॉलेट मधून जेव्हा पैसे कापले जातील तुम्हाला एसएमएस द्वारे माहिती दिली जाईल.

आता नवी कार खरेदी केल्यावर कार डिलर स्वतः फास्टॅग चिकटवून देत आहेत. जर तुमच्याकडे आधीच वाहन असेल तर तुम्ही टोल प्लाझावर फास्टॅग विकत घेऊ शकाल. यासाठी Registration Certificate (RC) आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आणि KYC संदर्भात इतर कागदपत्रे द्यावी लागतील (हे तुम्ही तुमचं वाहन वैयक्तिक/व्यावसायिक कारणासाठी वापरणार आहात त्यावर अवलंबून असेल.) याशिवाय Amazon आणि Paytm वर सुद्धा फास्टॅग खरेदी करता येईल!

एकदा फास्टॅग खरेदी केल्यावर तुम्हाला My FASTag अॅप घेऊन ते तुमच्या बँक अकाऊंटला लिंक करावं लागेल जेणेकरून पुढे फास्टॅग वॉलेट रीचार्ज करणं सोपं जाईल!

फास्टॅग खरेदी करताना किंवा वॉलेट रीचार्ज करताना काही बँका, कंपन्या कॅशबॅक सुद्धा देत आहेत. त्यानुसार ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. बरेच जण टॅगची किंमत १००, सिक्युरिटी डिपॉजिट २०० आणि बॅलन्स १५० एकूण ४५० अशा स्वरूपात फास्टॅग उपलब्ध करून देत आहेत. ही किंमत तुम्ही फास्टॅग कुठे खरेदी करत आहात त्यावर कमी जास्त होऊ शकेल.

Paytm द्वारे फास्टॅग खरेदी करण्यासाठी लिंक : https://paytm.com/fastag
Airtel द्वारे फास्टॅग खरेदी करण्यासाठी लिंक : https://www.airtel.in/bank/FASTag
SBI द्वारे फास्टॅग खरेदी करण्यासाठी लिंक : https://fastag.onlinesbi.com

Exit mobile version