Unacademy चा डेटाबेस हॅक : २.२ कोटी यूजर्सची माहिती डार्क वेबवर!

भारतातील सर्वात मोठ्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म पैकी एक असलेल्या Unacademy (अनअकॅडेमी) चा डेटाबेस जानेवारी मध्ये हॅक झाला होता. त्यावेळी १.१ कोटी युजर्सचा डेटा हॅक झाल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात तब्बल २.२ कोटी म्हणजे जवळपास सर्वच यूजर्सचा डेटा हा हॅकमध्ये हॅकर्सच्या तावडीत सापडला आहे. आता हॅकरने तो डेटाबेस डार्क वेबवरती 2000 डॉलर्स म्हणजे जवळपास दीड लाख रुपयांना विक्रीसाठी ठेवला असल्याचं समोर आलं आहे!

या हॅकमध्ये गूगल, इन्फोसिस, कॉग्निझंट, फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे ईमेल्ससुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे. Cyble नावाच्या अमेरिकन सेक्युरिटी संस्थेने याची माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार या डेटाबेसमध्ये युजरनेम, पासवर्ड, ईमेल, जॉइन केलेली तारीख, शेवटचं लॉगिन केलेली तारीख, नाव, प्रोफाइल अशी माहिती आहे!

डार्क वेब म्हणजे इंटरनेटवरची अशी जागा जी अॅक्सेस करायला खास सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशन करावं लागतं. येथील वेबसाइट गूगलसारख्या सर्च इंजिनवर सापडत नाहीत. नावाप्रमाणेच ही इंटरनेटची काळी बाजू आहे जिथे अवैध गोष्टी जास्त चालतात. अर्थात याचा वापर गोपनियतेसाठीही केला जातो. तर या डार्क वेबवर हॅकर्स त्यांनी हॅक केलेले डेटाबेस विक्रीसाठी ठेवतात जेणेकरून विक्री करणारा आणि खरेदी करणारा दोघांची ओळख बाहेर पडू नये.

यामध्ये लीक झालेले पासवर्ड SHA-256 hash ने एनक्रिप्ट केलेले असल्यामुळे हॅकर्सना ते वाचता येणार नाहीत असं सीईओ गौरव मुंजाळ यांनी सांगितलं आहे. मात्र तरीही जर कोणी यासोबत इतर वेबसाइटवरही तेच पासवर्ड वापरले असतील तर त्यांनी ते दोन्ही ठिकाणी बदलून घ्यावेत असंही सांगितलं आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक माहिती (क्रेडिट/डेबिट कार्डस) हॅकर्सकडे गेली नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही जर Unacademy वापरत असाल तर तुम्ही तुमचा पासवर्ड नक्की बदला असं आवाहन आम्ही करत आहोत. सोबत पुन्हा एकदा सांगत आहोत की एकच पासवर्ड दोन ठिकाणी वापरू नका. जगात हॅक होणार नाही अशी कोणतीही वेबसाइट नाही ही गृहीत धरून प्रत्येक वेबसाइटवर Sign Up करताना वेगळा पासवर्ड टाका. त्यामध्ये आपलं नाव, फोन नंबर अशा सोप्या गोष्टी टाकू नका.

Exit mobile version