Reels आता फेसबुकवरही उपलब्ध : पैसेसुद्धा कमावता येणार!

फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांनी काल जाहीर केलेल्या माहितीनुसार सध्या इंस्टाग्रामवर उपलब्ध असलेल्या शॉर्ट व्हिडिओ Reels आता फेसबुकवरसुद्धा उपलब्ध होत आहे. आत्ता अमेरिकेत असलेली ही सेवा आता १५० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय रील्स तयार करणाऱ्या क्रिएटर्सना व्हिडिओ तयार करण्यासाठी टूल्स, पैसे मिळवण्यासाठी पर्याय (Monetization) मिळणार आहे.

रील्स सध्या सर्वात जास्त वाढणारा कंटेंट प्लॅटफॉर्म आहे असं सांगताना क्रिएटर्सना कंटेंट तयार करणं, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यामार्फत पैसे मिळवून देणं यावर आम्ही भर देणार आहोत असंही सांगितलं आहे. Reels आता शब्दशः पूर्ण फेसबुकवर पाहायला मिळतील. स्टोरीमध्ये, ग्रुप्समध्ये, फीडमध्ये, पेजेसवर…

Reels Bonus Program द्वारे खास रील्स तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठी स्वतंत्र फंड तयार करण्यात येऊन त्यामार्फत व्हायरल रील्स बनवणाऱ्याना पैसे दिले जात आहेत. येत्या काही महिन्यात हा अमेरिकेपुरता मर्यादित असलेला प्रोग्राम इतर देशांमध्येही उपलब्ध करून दिला जाईल. यापुढे जाऊन फेसबुक आता ओव्हरले ॲड्स दाखवणार आहे ज्या व्हिडिओच्या खाली एका पारदर्शी पट्टीमध्ये दिसतील. सोबत स्टीकर ॲड्सचाही पर्याय देण्यात येणार असून यामुळे क्रिएटर त्यांची आवडीनुसार व्हिडिओमध्ये कुठेही ते जाहिरातीचं स्टीकर लाऊ शकतील.

या शिवाय in stream ads मार्फतही क्रिएटर्स पैसे कमवू शकतील. हे सर्व पर्याय लवकरच सर्व देशांमध्ये उपलब्ध होत आहेत.

एडिटिंगसाठी Remix, 60 secod reels drafts, video clipping अशा सोयी देण्यात येत आहेत. Reels आता जवळपास सर्वच ठिकाणी तयार करता येतील उदा. स्टोरीमध्ये, वॉच विभागामध्ये, फीडमध्ये, इ.

टिकटॉकने उभे केलेली मोठी स्पर्धा फेसबुकसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मला त्यांच्या कंटेंटविषयीच्या नियमांना असे बदल करण्यास भाग पाडत आहे. शॉर्ट व्हिडिओना मिळणारा प्रतिसाद प्रचंड मोठा आहे हे दिसून आल्यावर कमी होत चाललेली फेसबुक यूजर्सची संख्या वाढावी म्हणून आता reels फेसबुकवर आणणे आणि त्यामार्फत पैसे कमवण्याचे पर्याय देणे या गोष्टी घडत आहेत.

एका अर्थी हे चांगलं होत असलं तरी शॉर्ट व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो ते आपणास ठाऊक आहेच. सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शॉर्ट व्हिडिओच्या मागे पळू लागल्यामुळे नाईलाजाने का होईना चांगल्या क्रिएटर्सनाही आता शॉर्ट व्हिडिओ बनवावेच लागतील आणि नेमकं यामुळेच पाहायला मिळणाऱ्या कंटेंटचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावेल. केवळ व्हायरल होणारा कंटेंटच जर यूजर्स पाहत गेले तर माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी त्यांना वेगळे पर्याय पहावे लागतील.

अधिक माहितीसाठी खालील लिंक्सवर जा.

Exit mobile version