अडोबी Figma कंपनी विकत घेणार : ~१,६०,००० कोटी रुपयांचं अधिग्रहण!

Figma Adobe

फिग्मा (Figma) ही ग्रुप्ससाठी डिझाईन टूल्स उपलब्ध करून देणारी कंपनी आता अडोबी ही कंपनी विकत असल्याचं जाहीर झालं असून हा व्यवहार तब्बल 20 billion डॉलर्सचा म्हणजे जवळपास १,५९,३२३ कोटी रुपये इतका मोठा असणार आहे! फिग्मा हे टूल एकावेळी कंपनीमधील अनेकांना ऑनलाइन एकत्र डिझाईन्स, प्रोटोटाइप तयार करण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अडोबीने केलेलं फिग्माचं हे अधिग्रहण (Acquisition) आजवरच्या सर्वात मोठ्या अधिग्रहणांपैकी एक असेल.

अडोबीच्या क्रिएटिव क्लाऊडला या प्रकारात त्यांनी बरीच स्पर्धा निर्माण केली होती. फिग्मा आज जवळपास प्रत्येक Collaborative Designing मध्ये वापरलं जातं. डिझाईन्स, वायरफ्रेम्स, प्रोटोटाइप्स बनवण्यासाठी याचा वापर होतोय. अधिक माहितीसाठी लेखाच्या शेवटी असलेला व्हिडिओ पहा.

डिझाईन करणे, टीमचा इनपुट घेणे, फॉन्ट,अॅनिमेशन्स, रंग असे सर्वकाही पर्याय सर्वांना एकत्र आणून फायनल डिझाईन क्लाऊडमध्ये ऑनलाइन तयार करणे, फाइल्स पाठवणे, कॉमेंट्समार्फत चॅट करणे, ग्राहकाला फायनल आउटपुट हँडऑफ करणे असं सर्वकाही फिग्मामध्ये सहज करता येतं.

आता अडोबीने ही कंपनी विकत घेतल्यामुळे दोघांचे क्रिएटिव टूल्स वापरुन डिझाईनर्सना त्यांचं काम करणं खूपच सोपं होणार आहे. फॉटोशॉप, इलस्ट्रेटर यांच्यासोबत आता फिग्मासुद्धा जोडलं जाईल.

अडोबीचे प्रमुख शंतनू नारायण यांनी “अडोबीच्या मोठ्या कामगिरीचं मुळ म्हणजे आमची नवनवे प्रकार तयार करणं आणि नवं तंत्रज्ञान संशोधनामार्फत उपलब्ध करून देत राहण्याची क्षमता. अडोबी आणि फिग्मामुळे आमूलाग्र बदल होतील आणि आमच्या एकत्र येऊन क्रिएटिव काम करण्याच्या स्वप्नाला वेग मिळेल” अशा शब्दात त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

अपडेट १८-१२-२०२३ : हा व्यवहार आता रद्द करत असल्याचं जाहीर केलं असून UK आणि EU मधील नियामकांच्या दबावामुळे हे अधिग्रहण पूर्ण होणार नाही असं सांगितलं आहे! हा व्यवहार रद्द झाल्यामुळे आता अडोबीलाच फिग्मा कंपनीला १ बिलियन डॉलर्स द्यावे लागतील! अधिक माहिती : figma.com/blog/figma-adobe-abandon-proposed-merger

Exit mobile version