भारतीय बाजारपेठेत अद्ययावत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८००

टॅब्लेटच्या संदर्भात एक वेगळा अनुभव देणारा असे म्हणत सॅमसंगने जागतिक बाजारपेठेत आणलेला गॅलेक्सी नोट मालिकेतील ‘नोट ८००’ हा काही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नव्हता. मात्र चारच दोनच दिवसांपूर्वी सॅमसंगने तो भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. स्मार्टफोन आणि टॅब्लेटस् यांची लोकप्रियता वाढल्यानंतर सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या माध्यमातून बाजारपेठेत एक नवा मोहरा उतरवला होता.  सुरुवातीस त्याच्या यशाबद्दल अनेक जण साशंक होते. मात्र थोडय़ाच कालावधीत गॅलेक्सी नोट हे उत्पादन लोकप्रिय झाले.
खास करून कलावंतांमध्ये आणि तरुणांमध्ये. त्याचा आकार हा टॅबपेक्षा लहान आणि स्मार्टफोनपेक्षा मोठा असा होता. हे असे विचित्र आकाराचे उपकरण कुणी वापरेल का, अशी असणारी शंका काही महिन्यांतच विरून गेली होती.
१०.१ इंची डिस्प्ले
पण त्याचवेळेस आता ‘नोट’मधील गुणवैशिष्टय़े असलेला मोठय़ा आकाराचा हा नवा टॅब सॅमसंगने बाजारात आणला आहे. कागदावर नोंदी करता येतात, तशाच त्या ‘एस पेन’च्या माध्यमातून ‘नोट’वरही करता येतात, हे त्याचे वैशिष्टय़ होते. ते वैशिष्टय़ या नव्या मॉडेलमध्येही कायम आहे. याचा डिस्प्ले १०.१ इंचाच आहे.
फोटोशॉप टच
फोटोवर प्रक्रिया करण्यासाठी फोटोशॉप जगभरात सर्वाधिक वापरले जाते. आता ‘फोटोशॉप टच’ गॅलेक्सी नोट ८००मध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी एस पेनचा वापर करता येईल, अशा पद्धतीच्या सुधारणा त्यात करण्यात आल्या आहेत.
मल्टिस्क्रीन

या नव्या उत्पादनाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मल्टिस्क्रीन. म्हणजे एकाच वेळेस समोरच्या स्क्रीनवर दोन विंडोज सुरू करून काम करणे शक्य झाले आहे. किंवा एकाच वेळेस दोन अ‍ॅप्सवरही काम करणे आता शक्य आहे. नव्या १.४ गिगाहर्टझ् प्रोसेसरमुळे हे शक्य झाले आहे. शिवाय वापरताना तो हँग होऊ नये आणि काम थांबू नये, यासाठी २ जीबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच वेळेस व्हिडिओ पाहताना इतर पाने पाहणेही शक्य आहे. 
मल्टिटास्किंग
त्यातही दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करता याव्यात, यासाठी मोठय़ा स्क्रीनचे दोन भाग करून त्यात दोन्ही अ‍ॅप्लिकेशन्स किंवा दोन्ही पाने एकाच वेळेस पाहाता येतात. त्यामुळे इ-मेल पाहताना व्हिडिओही दुसऱ्या बाजूस पाहाता येऊ शकतो. आता या नव्या उपकरणाला मल्टिटास्किंगची क्षमता प्राप्त झाली आहे.
सध्या सॅमसंगचा गॅलेक्सी एस थ्री हा सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. कारण तो अ‍ॅपलच्या आयफोनशी थेट स्पर्धा करतो. सॅमसंगसोबतच्या खटल्यामध्ये अ‍ॅपलच्या हाती मोठे यश आलेले असले तरी त्यांनी सॅमसंगविरोधातील खटल्याला सर्वाधिक महत्त्व देणे यातच सॅमसंगचे यशही दडलेले आहे.
पॉप अप फीचर
 अद्ययावत आयफोनच्या काहीसा पुढे जाणारा असे वर्णन अनेक विशेषज्ज्ञांनी गॅलेक्सी एस थ्रीच्या बाबतीत केले. याच गॅलेक्सी एस थ्रीमधील लोकप्रिय ठरलेले ‘पॉप अप  फीचर’ या नव्या गॅलेक्सी नोट ८००मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे काही टीव्हींमध्ये उपलब्ध असणाऱ्या ‘पिक्चर इन पिक्चर’ या तंत्रासारखा अनुभव येतो.  
मिनी अ‍ॅप्स ट्रे
दररोज एखादी गोष्ट आपल्याला लागत असेल तर हाताशी असावी म्हणून आपण अशा वस्तू अशा प्रकारे काढून ठेवतो की, गरज भासल्यानंतर त्या लगेचच हाती येतील. हीच बाब लक्षात ठेवून सॅमसंगने या नव्या टॅबमध्ये मिनी अ‍ॅप्स ट्रेची सोय दिली आहे. या ट्रेमध्ये अलार्म, एस नोट, म्युझिक प्लेअर,
इ-मेल, कॅलक्युलेटर आणि वर्ल्ड क्लॉक आदी अ‍ॅप्सचा समावेश आहे.
एस पेन आणि एस नोटस्
या टॅबसोबत अद्ययावत एस पेन देण्यात आले आहे. ते तब्बल १०२४ विविध प्रकारच्या दाबांसाठी संवेदनक्षम असे आहे. याचा अर्थ असा की, कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारे कमी- अधिक दाब देऊन या पेनचा वापर केला तरी ते उत्तम रितीने काम करते. त्या पेनसाठी एक खास स्लॉट या टॅबमध्ये देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्लॉटमधून ते पेन बाहेर काढले की, आपोआपच स्वयंचलीत पद्धतीने त्याचा टास्कबार अ‍ॅक्टिवेट होतो आणि मग एस नोट किंवा फोटोशॉप टच अथवा पोलारिस ऑफिस चटकन सुरू करता येते. याचा आणखी एक विशेष म्हणजे आपल्या हवे असलेले प्रोग्रॅम्स अ‍ॅक्टिवेट करण्याची सोयही आहे. एस पेनने लिहिलेल्या गोष्टींसाठी ड्रॅग अ‍ॅण्ड ड्रॉपची सोयही देण्यात आली आहे. 

अ‍ॅडोब फोटोशॉप टच
अ‍ॅडोब फोटोशॉप टच हे या टॅबसाठी खास विकसित करण्यात आले आहे. एस पेनचा वापर करूनळे त्या योगे फोटोशॉप वापरता येते. त्यामुळे या पेनचा ब्रशसारखाही वापर करणे शक्य झाले आहे. फक्त पेनवरचा दाब कमी- अधिक करावा लागतो इतकेच. या शिवाय फोटोशॉपमधील लेअर्स, सिलेक् शन टूल सारख्या सोयीही वापरता येतातच. एकाच वेळेस यातील कॅमेऱ्याचा वापरही या लेअर्सच्या माध्यमातून करता येतो. आणि भन्नाट चित्रे त्याद्वारे मिळतात.
२ जीबी मोफत क्लाऊड सेवा
या सॅमसंग गॅलक्सी नोट ८०० सोबत आपल्याला मिळते ती २ जीबीची क्लाऊडवरील साठवण क्षमता तीही मोफत. शिवाय फोटोशॉप सिंक्रोनाइज्ड केलेत तर थेट इमेजेस त्यावर साठवता येतात.
शैक्षणिक अ‍ॅप
टॅब्लेटच्या क्षेत्रामध्ये आता सारे लक्ष केंद्रीत झाले आहे ते  विद्यार्थ्यांवर. सर्वच कंपन्या शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक दिसू लागले आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या आता त्यांचे टॅब्ज शैक्षणिक अ‍ॅप्ससह बाजारात आणू लागल्या आहेत. सॅमसंगनेही या टॅबमध्ये एज्युकेशन अर्थात शैक्षणिक अ‍ॅप्सची सोय दिली आहे. या ‘माय एज्युकेशन’ अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुमारे १० हजार मोफत व्हिडिओ उपलब्ध होणार आहेत. हे सर्व व्हिडिओ आणि उपलब्ध साहित्य हे भारतीय अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. पहिली ते बारावी अशा सर्व वर्गासाठीचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. या अ‍ॅप्समध्ये इ- बुक्स, सराव प्रश्नपत्रिका सारे काही उपलब्ध आहे. या शिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील शाळा- महाविद्यालयांची यादी उपलब्ध आहे.
५ मेगापिक्सेल कॅमेरा
या टॅबला मागच्या बाजूस ५ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूस १.९ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
या नोट ८०० मधील ऑल शेअर प्ले या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तो एचडी टीव्ही, फोन, मोबाईल, टॅब्ज, लॅपटॉप्स यांच्याशी जोडला जाऊ शकतो. 
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रु. ३९,९९०/-

Exit mobile version