आता फेसबुकचाही स्मार्टफोन येतोय!

FB1.jpgजगातील नंबर १ सोशल नेटवर्किंग साइट असलेले फेसबुक आता थेट तुमच्या खिशात ठाण मांडून बसणार आहे. कारण आतापर्यंत फेसबुक ही फक्त वेबसाइट होती, आता फेसबुक स्वतःचा स्मार्टफोन घेऊन बाजारात येतेय. पुढील आठवड्यात कंपनीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

फेसबुकच्या सा-या सुविधा गुगल अँड्रॉइडच्या नव्या वर्जनसह या फोनमध्ये उपलब्ध असतील. याच्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर बनविण्यात आले असून, तैवानमध्ये एचटीसी कंपनी हा फोन बनवित आहे. 

फेसबुकने ४ एप्रिलला होणा-या या पत्रकार परिषदेचे आमंत्रण पाठविले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, ‘चला, अँड्रोइडवर आपला नवा पत्ता शोधुया’. सिलिकॉन वॅलीतील मेनलो पार्कमध्ये असेलेल्या कंपनीच्या मुख्य कँपसमध्ये ही परिषद होणार आहे. 

आयडीसी या संशोधन संस्थेच्या अभ्यासानुसार आज अमेरिकेतील बहुसंख्य लोकांना स्मार्टफोनची सवय लागली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना जगाशी कनेक्टेड राहायला आवडते. त्यामुळे फेसबुकचा हा फोन त्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करेल. 

अमेरिकेत झालेल्या या अभ्यासात असे लक्षात आले की, ५ मधील ४ जण सकाळी उठल्यानंतर पहिल्या १५ मिनिटात आपला फोन चेक करतात. त्यातील सर्वात अधिक वापरल्या जाणा-या गोष्टींमध्ये मेसेजिंग, वेब ब्राउझिंग आणि फेसबुक आहे. त्यामुळे फेसबुकसाठी मोठा ग्राहकवर्ग असल्याचेच या अभ्यासाने स्पष्ट केले आहे. 

भारतातही आज ‘फोन टू स्मार्टफोन’ असे परिवर्तन मोठ्या प्रमाणात होत असताना दिसतत आहे. त्यामुळे आता हा फेसबुक फोन बाजारात आल्यावर काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Exit mobile version