‘गुगल ट्रान्स्लेटर’ अखेर मराठीतही!

सर्बियन , व्हिएतनामीपासून कन्नड , तामिळ ,बंगाली , तेलगूपर्यंत भाषा समजून घेणा-या गुगल ट्रास्लेटरला मराठी का कळत नाही ? असा प्रश्न आजवर अनेकदा विचारला गेला. इंटरनेटवर त्यासाठी अनेकांनी मोहीमाही राबविल्या. या सर्व मागण्या अखेर पूर्ण झाल्या आणि गुगलची भाषांतर सुविधा असेलेले ‘गुगल ट्रान्स्लेटर ‘ अखेर मराठीतही अवतरले. 


गुगल मराठी ट्रान्सलेटर  : translate.google.com

मराठीसह बोस्नियन , सेबियानो , हमाँग , जॅव्हेनिज या पाच नव्या भाषांसह एकूण ७० भाषांमध्ये गुगल ट्रान्स्लेटर म्हणजेच गुगलची भाषांतर सुविधा सज्ज झाली आहे. गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमधून त्याची घोषणा केली असून , मराठीसाठी अद्यापही ही सुविधा प्राथमिक स्थितीत असल्याचेही कबूल केले आहे. 

या आधी बंगाली , गुजराती , हिंदी , कन्नड , तामिळ , तेलगू , उर्दू या भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती. पण जगभरातील सुमारे सात कोटी तीस लाख लोक जी भाषा बोलतात ती मराठी मात्र गुगल ट्रान्सलेटरवर उपलब्ध नव्हती. आपली ही कमतरता गुगलने भरून काढली आहे. आता ‘ गुगल ट्रान्स्लेटर ‘ वर मराठीतून अन्य ६९ भाषा किंवा त्या ६९ भाषांमधून मराठीत भाषांतर करता येणे शक्य झाले आहे. 

अन्य भाषांप्रमाणेच मराठीत होणारे हे भाषांतर किंवा मराठीतून होणारे भाषांतर अचूक नाही. अद्यापही ही सुविधा प्राथमिक अवस्थेत असल्याने अचूक असण्याची अपेक्षा करणे बरोबर नाही. पण किमान ही सुविधा सुरू होणे महत्त्वाचे होते. आता ती अचूक करण्याची जबाबदारी मराठीप्रेमींनीही उचलावी, अशी गुगलची अपेक्षा आहे. 

आजही अनेक वाक्यांचे मराठीकरण करताना किंवा मराठी वाक्यांचे अन्य भाषेत भाषातंर करताना अनेक गमतीजमती होत आहेत. मराठी म्हणी आणि वाक्प्रचारांचे भाषांतर म्हणजे ‘ चकटफू हसवणूकीचा कार्यक्रम ‘ आहे. पण यात दुरुस्ती स्वीकारण्याची तयारी गुगलने दाखवली आहे. 

त्यासाठी त्यांनी ट्रान्स्लेटर टूलकिट आणि शो फ्रेजबुक असे दोन पर्याय दिले आहेत. तसेच ज्या शब्दांचे भाषांतर होत नसेल त्यावर ‘ क्लिक ‘ करून ते भाषांतर गुगलकडे पाठविण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधांचा जेवढा वापर वाढले तेवढे हे भाषांतर अधिक अचूक होईल. एकाच शब्दाचे विविध समनार्थी पर्यायही सुचविण्यात आले आहेत. उदाहरणार्थ water या इंग्रजी शब्दासाठी जल , समुद्र , पाणी पाजणे असे पर्याय दाखविण्यात येतात. अर्थातच त्यातही त्रुटी आहेत. पण गुगलला उशिरा का होईना सुचलेल्या या शहाणपणाचे स्वागत करायला हवे , असे इंटरनेट क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. 

Exit mobile version