गॉगलने स्मार्टफोन चार्ज

डिझायनर असलेल्या पुणेकर सायली काळुस्करने सौर ऊर्जेचा वापर करून सनग्लासेसव्दारे स्मार्टफोन चार्जर तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जगभरातील माध्यमांनी या संशोधनाची दखल घेतली आहे.http://sayaleekaluskar.com या वेबसाइटवर सायलीने केलेल्या कामाची सविस्तर माहिती आहे. 

सायलीने संशोधनासाठी ‘ रे बन शमा शेड ‘ या गॉगलचा (सनग्लास) वापर केला. गॉगलच्या फ्रेमला सोलर पॅनेल बसवले. दिवसभर सूर्यप्रकाशात असताना ते चार्ज होतात आणि तयार झालेल्या ऊर्जेवर ते सूर्य नसतानाही एखादा स्मार्टफोन चार्ज करू शकतात, असा हा प्रयोग आहे. ‘आयफोन-५ ‘ स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी पुरेशी ऊर्जा या गॉगलद्वारे तयार झाली. सॅनफ्रान्सिस्को येथील ‘मियामी अॅड स्कूल ‘ च्या विद्यार्थी प्रकल्पांतर्गत सायलीच्या प्रकल्पाचा समावेश होता. सायलीच्या या संशोधनामुळे विद्युत उपकरणाद्वारे स्मार्टफोन सतत चार्ज करण्याचा त्रास वाचणार आहे. 

वेबसाइटवरील माहितीनुसार, सायली पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेची विद्यार्थिनी आहे. नू. म. वि. ज्युनियर कॉलेजमधून विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर भारती विद्यापीठातून फाइन आर्टचे शिक्षण तिने घेतले आहे. या वर्षी मियामी अॅड स्कूलमध्ये ‘ आर्ट डायरेक्शन ‘ ती शिकत आहे. पुणे, जर्मनी, अमेरिका येथेही तिने काम केले आहे.

 

Exit mobile version