गुगलचे मिशन नेट वुमन!

googleआई मुलाचा अभ्यास घेतेय… तिच्या हातात एक पुस्तक आहे… ती मुलाला प्रश्न विचारते.. तो विचारात पडतो. ‘इतका सोपा प्रश्न आहे!’, ती म्हणते. त्यावर मुलगा आईच्या हातातून पुस्तक काढून घेतो आणि म्हणतो, ‘सोपा असेल तर तूच सांग ना त्याचं उत्तर.’ ती घडाघडा माहिती सांगू लागते आणि मुलगा चकीत होऊन तिच्याकडे बघू लागतो. तिने आपल्या मांडीवर मोबाइल ठेवलेला असतो आणि इंटनेटवरील माहिती ती त्याला सांगत असते. गुगल इंडियाच्या नव्या मोहिमेची ही जाहिरात आहे. वर्षभरात पाच कोटी महिलांना इंटरनेटसॅव्ही बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 

जवळपास दोन अब्ज इंटरनेट यूजर्स असलेला भारत इंटरनेट मार्केटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ऑनलाइन यूजर्सपैकी केवळ एक तृतीयांश यूजर्स या महिला आहेत. महिलांचे सबलीकरण करण्यात आणि त्यांचे आयुष्य बदलण्यात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे गुगल इंडियाचे म्हणणे आहे. इंटरनेटमुळे महिलांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू, बालमृत्यू दर कमी होण्यासही मदत होऊ शकते, असे अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 

महिलांसाठी वेबसाइट 

महिलांना इंटरनेटचे कोणते फायदे मिळू शकतात याबाबत जागृती करणे, त्यांना इंटरनेटबाबत साक्षर बनवणे, त्यांना इंटरनेट सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आदी उपक्रम गुगल इंडिया राबवणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून गुगल इंडिया ‘मास मीडिया कॅम्पेन’ सुरू करणार आहे. महिलांसाठी www.hwgo.com ही वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. इंटरनेट आणि कम्प्युटर कसे वापरावेत याबद्दल बेसिक माहिती, मार्गदर्शन करणारे काही व्हिडीओही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ही वेबसाइट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 

हेल्पलाइन 

इंटरनेटबद्दल कोणतीही समस्या असल्यास महिला १८००४१९९९७७ या टोल फ्री क्रमांकावर फोनही करू शकतात. या उपक्रमाला एचयूएल, इंटेल आणि अॅक्सिस बँकेचे सहकार्य लाभले आहे. इंटेल महिलांसाठी ‘ईझी स्टेप’ नावाने मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करणार आहे. ते अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

Exit mobile version