तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीची इ-वॉलेट योजना

इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरशन अर्थात आयआरसीटीसीने ग्राहकांसाठी नवी योजना सुरु केली आहे. इंटरनेटद्वारे तिकीट खरेदी अधिक सोयीस्कर करण्यासाठी आयआरसीटीसीने ‘इ-वॉलेट योजना’ सुरु केली आहे.

‘इ-वॉलेट’ ही एक रिकरिंग डिपॉझिट करण्याची योजना आहे. याअंतर्गत ग्राहकांचं आयआरसीटीसीमध्ये एक अकाऊंट असेल. याचा उपयोग भविष्यात आयआरसीटीसीच्या वेबसाईटद्वारे इ-तिकीट बुकिंग करण्यासाठी केला जाईल, असं या योजनेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

सध्या इ-तिकीट बुकिंग करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे दिले जातात. ही प्रक्रिया थोडी मोठी आहे. प्रक्रियेत ग्राहकांना पैसे भरण्यासाठी आयआरसीटीसीच्या सर्व्हरवरुन बँकेच्या सर्व्हरला ट्रान्सफर केलं जातं. त्यानंतर पुन्हा आयआरसीटीसीच्या सर्व्हरला जोडलं जात. ही प्रक्रिया मोठी असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.

मात्र ‘इ-वॉलेट योजने’मुळे ग्राहकांचा पैसे आधीच आयआरसीटीसीमध्ये जमा असतील. त्यामुळे तिकीटासाठी पैसे देताना त्यांचा बराच वेळ वाचेल. तसंच कधी कधी पैसे दिल्यानंतरही तिकीट बुकिंग न होण्यासारख्या समस्या उद्भवणार नाही.

ही योजना सुरु झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत चार हजार ग्राहकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

Exit mobile version