खुशखबर…नोकियाचा अँड्रॉइड फोन येतोय!

NOKIAभारतातील मोबाइल बाजारपेठेवर अनेक वर्षं अधिराज्य गाजवणारी, ‘विश्वासाचं दुसरं नाव’ अशी ख्याती मिळवणारी, पण अँड्रॉइडच्या लाटेत पुरती बुडालेली नोकिया कंपनी आता आपला पहिलावहिला अँड्रॉइड फोन घेऊन येण्याच्या तयारीत आहे. त्याचं सांकेतिक नाव ‘नॉर्मेंडी’ असून हा स्वस्त-मस्त फोन २०१४ मध्ये बाजारात उडी घेईल, अशी कुणकुण लागली आहे.

आशा आणि ल्युमिया सीरीज तरुणांच्या आणि ‘बिझनेस क्लास’च्या पसंतीला उतरल्यानं नोकियाची गाडी काही प्रमाणात रुळावर आली आहे. नाहीतर, सॅमसंग आणि अन्य कंपन्यांनी अँड्रॉइडचं अस्त्र वापरून त्यांना अगदी समूळ उपटूनच टाकलं होतं. परंतु, ‘विंडोज’नं त्यांना आधार दिला आणि नव्यानं उभं राहण्याची उमेदही दिली. त्याच जोरावर, तेही आता अँड्रॉइडच्या मैदानात उतरायला सज्ज झाले आहे. तेही, गुगलची साथ न घेता.

‘द व्हर्ज’ मॅगझिनमधील बातमीनुसार, नोकियाच्या अँड्रॉइड फोनचं सांकेतिक नाव (कोडनेम) नॉर्मेंडी असं आहे. नोकिया कंपनीत त्याला बरीच नावं दिली गेली आहेत. अॅमेझॉनने किंडल फायर टॅब्लेटमध्ये जे व्हर्जन वापरलं होतं, त्याच व्हर्जनची चाचणी नोकिया करतेय. हे व्हर्जन गुगलपेक्षा खूप वेगळं आहे. अर्थात, अँड्रॉइडवरची सगळी लोकप्रिय अॅप नोकिया नॉर्मेंडीवरही उपलब्ध होणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. हा मोबाइल २०१४ मध्ये लॉन्च केला जाणार आहे.

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी ‘इवलीक्स’नं नॉर्मेंडीचा एक फोटो प्रसिद्ध केला होता. तेव्हा तो आशाच्या सीरिजमधला आहे की ल्युमिया आहे, यावरून बरेच तर्क लढवले जात होते. परंतु, हा अँड्रॉइड फोन असल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे नोकियाचा हा फोन मोबाइलविश्वात खळबळ उडवून देणार, हे नक्की आहे.

Exit mobile version