थ्री-डी प्रिंटर बांधणार घर

prtप्रिंटिंग तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीच्या आधारे काही वस्तू थ्री-डी प्रिंटरमधून तयार करता येऊ लागल्या आहेत. आता मात्र शास्त्रज्ञांनी नवा थ्री-डी प्रिंटर विकसित केला असून हा प्रिंटर चोवीस तासांच्या कालावधीत सुमारे २,५०० चौरस फुटांचे घर बांधू शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बेहरोख खोश्नेविस यांनी हा प्रिंटर विकसित केला आहे. रोबोच्या आकाराचा हा प्रिंटर कंप्युटरमध्ये घराचे रचनाचित्र तयार झाल्यानंतर त्यानुसार बांधणी करू शकतो. या प्रिंटरमध्ये क्रेनची सुविधा आहे. त्यामुळे बांधकामासाठी आवश्यक अवजड साहित्य विशिष्ट ठिकाणी पोहचवण्याचे काम हा प्रिंटर करतो. त्यानंतर घराच्या आकृतिबंधाला अनुसरून या प्रिंटरच्या हालचाली ठरवण्यात येतात व त्यानुसार बांधकाम होते. या थ्री-डी प्रिंटरमध्ये खोश्नेविस यांनी काँटोर क्राफ्टिंग तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे काँक्रिटचे थर रचून त्याआधारे बांधकाम करता येते. या तंत्रज्ञानाची सखोल माहिती देण्यासाठी www.contourcrafting.org ही वेबसाइट तयार करण्यात आली असून या वेबसाइटवर थ्री-डी प्रिंटरकडून घर कसे बांधण्यात येईल, याचा व्हिडिओही अपलोड करण्यात आला आहे.

काउंटर क्राफ्टिंग तंत्रज्ञानामुळे स्थापत्य रचनेनुसार सुट्या भागांची जुळवणी, तसेच प्लास्टर, फरशीकाम इत्यादी कामे यांत्रिकपणे होऊ शकतात. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकाच रचनेची काही घरे, अथवा विविध रचनांची घरेही कमी कालावधीत बांधता येऊ शकतात. निवासी व व्यावसायिक घरबांधणीच्या रचनेमधील फरक लक्षात घेऊन हा प्रिंटर तीन प्रकारांमध्ये विकसित करण्यात आला आहे. बांधकाम झाल्यानंतर करण्यात येणारी इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, एअर कंडिशनिंग इत्यादी कामेही या प्रिंटरच्या मदतीने करता येऊ शकतात. या प्रिंटरच्या वापरामुळे कमी वेळात, किफायतशीर घरबांधणी शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे बांधकामावेळी लागणाऱ्या उर्जेची बचत करणे शक्य होणार असून कार्बन वायूचे उत्सर्जन कमी होणार असल्याने प्रदूषणातही घट होणार असल्याचा दावा केला आहे.

पृथ्वीप्रमाणेच अन्य ग्रहांच्या पृष्ठभागावर बांधकाम करण्यासाठीही हा प्रिंटर उपयुक्त ठरू शकतो. या प्रिंटरच्या सहाय्याने चंद्र व मंगळावरही बांधकाम करता येऊ शकते, असा दावा खोश्नेविस यांनी केला आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास या शतकाच्या अखेरीपर्यंत अन्य ग्रहावर निवास करण्याचे मानवाचे स्वप्न साकार होऊ शकेल. या प्रिंटरविषयी खोश्नेविस यांनी केलेले सादरीकरण www.youtube.com/watch?v=JdbJP8Gxqog या यूआरएलवर उपलब्ध आहे.

Exit mobile version