फेक फेसबुकींग

सोशल नेटवर्कींग साईट फेसबुक ही आता फेक अकाउंटच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत आले आहे. फेसबुकने नुकतीच जाहीर केलेली फेक अकाउंटची आकडेवारी फेसबुक युजर्सना थक्क करणारी आहे. फेसबुकच्या या रिपोर्टमुळे आता फेसबुकसंदर्भात सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे झाले असून अनोळखी फ्रेण्डस् रिक्वेस्ट्स स्वीकारताना कबरदारी घेणे हितावह ठरणार आहे.

facebookफेसबुक ही सोशल नेटवर्कींग साईट्समधली अत्यंत लोकप्रिय साईट समजली जाते. फेसबुक युजर्सची संख्या आणि लोकप्रियता दिवसागणिक वाढते आहे. भारतात तर मोठ्या प्रमाणात फेसबुक युजर्स आहेत. मात्र फेसबुकच्या याच लोकप्रियतेचा गैरफायदा घेत काहीजण खोटे (फेक) अकाउंट तयार करुन दुसऱ्या युजर्सना अडचणीत आणण्याचा प्रयत्न किंवा मनस्ताप होईल असे प्रकार करत आहेत. सद्यस्थितीत संपूर्ण जगभरात फेसबुकवर ११९ कोटी अकाउंट्स आहेत. त्यापैकी तब्बल दहा कोटी अकाउंट ‘फेक’ असल्याची माहीती फेसबुकने जाहीर केली आहे. फेसबुकच्या नियमानुसार एका व्यक्तीच्या नावावर एकच अकाउंट असायला हवे मात्र त्याच युजरचे दुसरे अकाउंट असेल तर ते फेक समजले जाते. त्यामध्ये इतर फेक अकाउंटचाही समावेश केला जातो.

अशी फेक अकाउंट्स बनवून दुसऱ्या युजर्सना अनेक प्रकारचा त्रास दिला जातो. कधी कधी तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला जातो. फेक अकाउंट तयार करुन स्वतःच्या फोटोंना, स्टेटसला आणि प्रोफाईलला लाईक किंवा कमेण्टस् करुन घेतल्या जातात. फेसबुकच्या माध्यमातुन घडणाऱ्या अनेक गुन्ह्यातही फेक अकाउंटचाच सहभाग जास्त असतो. अशा बनावट अकाउंटमुळे अनेक गंभीर गुन्हे सतत घडत असतात. फेक अकाउंटच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक किंवा तत्सम प्रकारची फसवणूक केली जाते. काहीजण तर सुरुवातीला विश्वासात घेवून चॅटींग करतात आणि नंतर त्या युजर्सला ब्लॅकमेल करुन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात.अनेक कलाकार, राजकीय नेते, खेळाडू यांसारख्या सेलिब्रेटी्जचेही फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतला जातो. फेसबुकवरील फेक अकाउंटची संख्या ही भारत आणि तुर्कस्थानसारख्या देशात सर्वाधिक असल्याचे फेसबुकने जाहीर केले आहे.

फेक अकाउंटच्या या समस्येने फेसबुक कंपनीही चिंतेत आहे. फेक अकाउंटच्या या त्रासापासून युजर्सनी वेळीच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. थोडीशी काळजी घेतली तर आपण या फेक जाचापासून सेफ राहू शकतो.

अशी घ्या दक्षता
– कुणाही अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली असेल तर ती अॅक्सेप्ट करण्याची घाई करु नका. कुठलीच ओळख नसेल तर अॅक्सेप्ट करण्याऐवजी रिजेक्ट करा.
– आपली फ्रेण्डलीस्ट एकदा चेक करुन घ्या. त्यात कुणी अनोळखी व्यक्ती असेल तर त्याला अनफ्रेण्ड करुन टाका.
– फ्रेण्ड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करण्यापूर्वी त्या व्यक्तीचे प्रोफाईल तपासून घ्या आणि टाईमलाईनवर एक नजर टाका. त्यात काही आक्षेपार्ह मजकूर, फोटो अथवा व्हिडीओ आढळल्यास क्षणाचाही विलंब न लावता ती रिक्वेस्ट रिजेक्ट करा. ते अकाउंट फेक असू शकते.
– काही जणांना फेसबुकवर मित्रांची संख्या खूप जास्त असणे आणि आपली फ्रेण्डलीस्ट मोठी असणे हा मोठा पराक्रम वाटतो. फ्रेण्डलीस्ट मोठी असणे हे फेसबुकवरील प्रतिष्ठेचं लक्षण वाटत असेल तर तो गैरसमज आहे. अशा मोठ्या फ्रेण्डलीस्टमध्ये कितीतरी फेक अकाउंट्स असू शकतात. त्यामुळे मोठ्या फ्रेण्डलिस्टचा मोह टाळाच.
– अनोळखी व्यक्तींशी शक्यतो चॅटींग करु नये अन्यथा तुमच्या समस्या वाढू शकतात.
– फेसबुकवर आपले फोटो अपलोड करताना प्रायव्हसी सेटींग चेक करुन घ्या. तुमचे फोटो चोरुन तुमच्याच नावाने कुणी दुसरा फेक अकाउंट बनवू शकतो.

फेसबुकचा अहवाल काय म्हणतो
जगभरात ११९ कोटी युजर्स असलेल्या फेसबुकच्या नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाही रिपोर्टनुसार, आजमितीस फेसबुकवर सुमारे दहा कोटी फेक अकाउंट असुन भारत आणि तुर्कस्थानात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त अकाउंट असणे हे फेसबुकच्या नियमाचे उल्लंघन ठरते. जगात दोन खाती असणाऱ्या ४.३ टक्के व्यक्ती असून अन्य फेक अकाउंटची संख्याही मोठी आहे.

राकेश हिरे, कॉलेज क्लब रिपोर्टर

Exit mobile version