बर्कशायर हॅथवेची पेटीएममध्ये गुंतवणूक!

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर असलेल्या वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी (जिची मालकी One97 Communications Ltd कडे आहे) पेटीएममध्ये गुंतवणूक केली आहे! बर्कशायर हॅथवे इंक.चे इव्हेस्टमेन्ट मॅनेजर टॉड कॉम्ब्ज यांनी याबाबत पुढाकार घेत गुंतवणूक पूर्ण केलीय आणि आता ते One97 Communications च्या बोर्डवर सुद्धा असतील!

बर्कशायर हॅथवेची ही कोणत्याही भारतीय कंपनीमध्ये पहिलीच गुंतवणूक आहे! ही गुंतवणूक ३% ते ४% पर्यंत समभागांच्या रूपात असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. पेटीएमचं एकूण वॅल्युएशन आता 10 ते $12 बिलियन डॉलर्सवर पोहचेल!

पेटीएम बर्कशायर हॅथवेची खरतर खाजगी टेक्नॉलॉजी कंपनीत पहिलीच गुंतवणूक म्हटलं जात आहे. “पेटीएमची कामगिरी पाहून आम्ही प्रभावित झालो असून आम्हाला त्यांच्या वाढीचा एक भाग बनताना आनंद होतोय” असं कॉम्ब्ज म्हणाले.

यानंतर बर्कशायर हॅथवेची इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याबाबत काही योजना आहे का याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही.

विजय शेखर शर्मा

“आम्हाला या भागीदारीमुळे आनंद होतोय. बर्कशायरचा आर्थिक क्षेत्रातील अनुभव पेटीएमसाठी ५ कोटी भारतीयांना आर्थिक दृष्ट्या पर्याय देण्यात फायदेशीर ठरेल. टॉड यांचं बोर्डवर स्वागत करताना  मला अभिमान वाटत आहे” असं पेटीएम संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं आहे.

बर्कशायर हॅथवे आता पेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्या जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप, चीनच्या अलिबाबा ग्रुप आणि अॅंट फायनान्शियल इ सोबत सामील झाली आहे! अलीकडे भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात वाढलेली स्पर्धा गूगल पे, अॅमेझॉन पे, भीम, फ्लिपकार्टच्या फोनपे आणि लवकरच येत असलेली व्हॉट्सअॅपची पेमेंट सेवा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे!

काही दिवसांपूर्वीच पेटीएममार्फत केरळ पूरग्रस्तांसाठी काही तासातच वापरकर्त्यांकडून ४० कोटी रुपये उभारण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं! 

search terms : Berkshire Hathaway buys stake in Paytm Marathi

Exit mobile version