मायक्रोसॉफ्ट विंडोज ७, विंडोज १० मोबाइलचा सपोर्ट बंद होणार!

विंडोज १० मोबाइलचाही सपोर्ट डिसेंबरमध्ये संपणार, अँड्रॉइड/iOS कडे वळण्याचा सल्ला!

तुम्ही अजूनही विंडोज ७ वापरत असाल तर तुम्हाला लवकरच मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या पुढील आवृत्त्यांना अपग्रेड करावं लागेल. काही दिवसांपूर्वीच विंडोज १० ने एकूण यूजर्सच्या संख्येमध्ये विंडोज ७ ला मागे टाकलं आहे. त्यामुळे का होईना विंडोज सेव्हनचा अधिकृत सपोर्ट यावर्षी १४ जानेवारी २०२० मध्ये पूर्णतः थांबवला जाणार आहे. खरेतर हा सपोर्ट २०१५ मध्येच थांबवण्यात आला आहे. मात्र मायक्रोसॉफ्टने तोवर अनेक लोक विंडोज ७ चाच वापर करत असल्यामुळे मोफत सेक्युरिटी अपडेट्स देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हे सर्व अपडेट्ससुद्धा थांबवण्यात येतील…

मायक्रोसॉफ्टने ज्या विंडोज ७ ग्राहकांना शक्य असेल त्यांनी विंडोज १० या सध्याच्या ऑपरेटिंग सिस्टमला अपग्रेड कराव असा सल्ला दिला आहे! जानेवारी २०२० नंतरही तुम्ही विंडोज ७ वापरू शकाल मात्र मायक्रोसॉफ्टकडून अधिकृतरित्या सुरक्षेसंबंधित अपडेट्स बंद असल्यामुळे सुरक्षेसंबंधित अडचणी उद्भवू शकतात.

आता विंडोज १० चा बाजारातील एकूण हिस्सा ३९.२२ वर असून विंडोज ७ ३६.९ टक्क्यांवर घसरल आहे. विंडोज ८.१ ४.४१ टक्क्यांवर आहे तर एकेकाळी राज्य केलेली विंडोज एक्सपी ४.४५ वर आहे!
हे अपडेट्स सामान्य वापरकर्त्यांसाठी बंद होणार असले तरी एंटरप्राईज ग्राहक अतिरिक्त पैसे देऊन जानेवारी २०२३ पर्यंत वाढवू शकतात!

विंडोज ७ सोबत विंडोज १० मोबाइलचाही सपोर्ट लवकरच बंद होणार असून मायक्रोसॉफ्टने मध्यंतरीच मोबाइल बाजारातून पाय काढून घेण्यास सुरुवात केली होती आणि ह्या निर्णयाने तर त्यावर शेवटचं शिक्कामोर्तब झालं आहे! १० डिसेंबर २०१९ नंतर मायक्रोसॉफ्ट विंडोज १० मोबाइल फोन्सना कसलंही अपडेट देणार नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये मायक्रोसॉफ्टने नवा विंडोज स्मार्टफोन सादर करणं थांबवलं होतं… यानंतर आम्ही ग्राहकांना अँड्रॉइड किंवा iOS (आयफोन्स) डिव्हाइसेसकडे वळण्याचा सल्ला देत आहोत असं मायक्रोसॉफ्टने वेबसाईटवर सांगितलं आहे!

अपडेट (१५-०१-२०२०) : सरतेशेवटी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद केला असून १४ जानेवारी २०२० पासून विंडोज ७ ला कोणतेही अपडेट्स दिले जाणार नाहीत. अनेक ठिकाणी अजूनही होत असलेला वापर पाहून मायक्रोसॉफ्टला याचा सपोर्ट वारंवार वाढवावा लागला होता. आजही अनेक एटीएम्समध्ये विंडोज ७ असलेल्या कम्प्युटर्सचाच वापर केला जात आहे.
अधिकृत माहिती : https://www.microsoft.com/en-in/windows/windows-7-end-of-life-support-information

Exit mobile version