WWW वेबला ३० वर्षे पूर्ण : वर्ल्ड वाईड वेबचं माहिती साम्राज्य!

सर टिम बर्नर्स ली यांनी आजच्याच दिवशी तीस वर्षांपूर्वी वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात केली होती. WWW जे द वेब या नावानं ओळखलं जातं ही एक अशी जागा आहे जिथे माहितीची देवाणघेवाण होते ज्यासाठी यूनिफोर्म रिसोर्स लोकेटर्स (URLs) चा वापर करून स्वतंत्र ओळख दर्शवली जाते किंवा पत्त्याप्रमाणे यांचा वापर होतो. हे सर्व हायपरटेक्स्टद्वारे जोडलेले असतात आणि यांचं वेब इंटरनेटमार्फत ब्राऊजर या सॉफ्टवेअरद्वारे वापरता येतं!

इंटरनेट आणि वर्ल्ड वाईड वेब या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची नोंद घ्यावी

इंटरनेट हे अनेक नेटवर्क्स मिळून बनलेलं नेटवर्क आहे तर वर्ल्ड वाईड वेब हा केवळ माहितीचा एक फार मोठा संग्रह आहे जो इंटरनेटमार्फत आपण पाहू शकतो.
Sir Tim Berners-Lee

इंग्लिश शास्त्रज्ञ सर टिम बर्नर्स ली (Tim Berners-Lee) यांना WWW(World Wide Web) च्या शोधाच जनक मानलं जातं. त्यांनी १९८९ मध्ये सर्न (CERN) जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे काम करत असताना www ची सुरुवात केली. १९९० मध्ये पहिला वेब ब्राऊजर कोड लिहिला आणि हाच जानेवारी १९९१ मध्ये CERN च्या बाहेर इतर संस्थांना उपलब्ध करून देण्यात आला. यानंतर ऑगस्ट १९९१ मध्ये हा सामान्य लोकांनाही उपलब्ध झाला. वर्ल्ड वाईड वेब माहिती संदर्भातील क्रांतीच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. करोडो लोकांच्या दैनंदिन उपयोगी पडणारं हे टुल इंटरनेटद्वारे मोठी माहिती उपलब्ध करून देतं.

वर्ल्ड वाईड वेबला ३० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त गूगलचं खास डूडल!

आपण वेबसाइटच्या यूआरएल आधी लावत असलेलं www म्हणजे आपण आपल्या ब्राऊजर (क्रोम/फायरफॉक्स/इ.) यांना इंटरनेट विश्वातील www येथे असलेल्या माहितीच्या पत्त्याबद्दल माहिती देत असतो. उदा. www.google.com

इंटरनेट व त्यानंतर वेबचा झालेला प्रवास (संदर्भ : इंटरनेट)

वेब रेसोर्सेस पुढील पैकी कोणत्याही स्वरुपात असू शकतात : इमेजेस, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, ऑडिओ, फाइल्स, इ. डाऊनलोड करता येतील अशा मीडिया. वेब पेजेस मात्र हायपरटेक्स्टमध्ये तयार केलेले असतात जे हायपरटेक्स्ट मार्कअप लॅंग्वेज (HTML) मध्ये लिहलेले असतात. यामुळे हायपरलिंक्स जोडता येतात जे वेबवरील माहिती एकमेकांना जोडण्यास किंवा लिंक करण्यास मदत होते. असे अनेक वेब रेसोर्सेस मिळून एक वेबसाइट तयार होते. या वेबसाइटसाठी स्वतःचं डोमेन नेम असतं जो त्या वेबसाइटचा स्वतःचा खास पत्ता समजा उदा मराठीटेकच्या वेबसाइटचा URL पत्ता www.marathitech.in असा आहे. तर ह्या सर्व वेबसाइट्स कुठेतरी सर्व्हरवर साठवून ठेवलेल्या असतात ज्या एखाद्या यूजरने मागणी करताच वेब सर्व्हर प्रोग्रामद्वारे इंटरनेट मार्फत यूजरच्या रिक्वेस्टला उत्तर देतात आणि अशा प्रकारे इंटरनेट यूजर्सना माहितीचा खजिना वर्ल्ड वाईड वेबद्वारे खुला होतो…!

बर्‍याच जणांचा आणखी एक गैरसमज आहे तो म्हणजे यूआरएलमध्ये www नसलेली वेबसाइट असूच शकत नाही. तर आता www न वापरतासुद्धा वेबसाइट तयार करता येते. तसेच वेबसाइटचा पत्ता टाकताना जवळपास सर्वच वेबसाइटना www न टाकताही उघडता येतं. उदा. www.google.com ऐवजी google.com असं लिहिलं तरी आपोआप www टाइप झालेलं पहायला मिळेल. (अर्थात हे त्या ठराविक वेबसाईट तयार करणार्‍या डेव्हलपरवर अवलंबून आहे की त्यांनी www redirect साठी सेटिंग्स बदलल्या आहेत की नाही…)

अधिक माहितीसाठी काही संदर्भ :
The World Wide Web: The Invention That Connected The World
Who invented the internet?
World Wide Web Wikipedia
World Wide Web Foundation


Exit mobile version