यूट्यूबरची २ कोटी झाडे लावण्याची #TeamTrees मोहीम! : MrBeast

TeamTrees MrBeast

जगातल्या सर्वात प्रसिद्ध वेबसाइट यूट्यूबवर खास व्हिडिओ तयार करून अपलोड करणाऱ्याना यूट्यूब क्रिएटर्स किंवा यूट्यूबर म्हटलं जातं यापैकी एक म्हणजे MrBeast ज्याचं खरं नाव जिमी डोनाल्डसन असं आहे याने त्याच्या यूट्यूब चॅनलचे २० मिलियन सबस्क्रायबर्स होत असताना ट्विटरवर प्रश्न विचारला की माझ्या २० मिलियन (२ कोटीव्या) सबस्क्रायबरला काय देऊ? तर त्यावर रेडिट या दुसऱ्या प्रसिद्ध वेबसाईटवर अनेकांनी त्याने २० मिलियन म्हणजे २ कोटी झाडे लावावीत असं सुचवलं. Mark Rober, SmarterEveryDay, Kurzgesagt, AsapSCIENCE अशा इतर यूट्यूबर्सनीही ही कल्पना उचलून धरत आम्ही सहकार्य करू असं जाहीर केलं आणि मग मे महिन्यात सुरुवात झालेली ही गोष्ट आता ऑक्टोबरमध्ये पूर्णत्वास जात असून या मोहिमेद्वारे 1 डॉलर दान केल्यावर त्याचं 1 झाड लावलं जाणार आहे. यासाठी त्यांनी Arbor Day Foundation सोबत भागीदारी केली असून हे फाऊंडेशन त्यांना जगातल्या विविध ठिकाणी ही झाडे लावण्यात मदत करणार आहे.

एका भन्नाट कल्पनेतून सुरू झालेली ही #TeamTrees मोहीम आता व्यापक रूप घेत असून आता अनेक मोठी नावे यासोबत जोडली जात आहेत. कालच टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी टीमट्रीजसाठी तब्बल ७ कोटींची (1 Million Dollars) मदत जाहीर केली असून याद्वारे दहा लाख झाडे लावली जातील! ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनीही जवळपास १ कोटी रुपये जाहीर केले असून याद्वारे १५०००० झाडे लावली जातील! यूट्यूबने सुद्धा स्वतः मदत जाहीर केली आहे! स्वतः MrBeast नेसुद्धा एक लाख डॉलर्स दिले असून याची 1 लाख झाडे लावली जातील!

MrBeast हा खरतर काही विचित्र कल्पना घेऊन अचाट व्हिडिओ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. उदा. एखाद्या दुकानात जाऊन सगळ्याच वस्तु खरेदी करणे, गेम स्ट्रीमर्सना एकावेळी एक लाख डॉलर्स डोनेट करणे, वेटरला 20000 डॉलर्स टीप देणे असे व्हिडिओ टाकून लाखों views मिळवून त्याद्वारे आलेलं उत्पन्न पुन्हा असेच व्हिडिओ बनवण्यात वापरणं यासाठी हा मिस्टर बीस्ट ओळखला जातो. मात्र यावेळी काही सामाजिक कार्यासाठी त्याच्या प्रसिद्धीचा वापर केला जात असून यामुळे संबंध यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया एकत्र येत असून हा लेख लिहीत असताना 2,00,00,000 पैकी 7,810,507 झाडे लावण्यासाठी मदत जमा झाली आहे!

https://www.teamtrees.org/

अशा कोट्यवधी झाडे लावण्याच्या बऱ्याच मोहिमा निघतात मात्र प्रत्यक्षात लावलेली झाडे खरंच जगवली जातात का प्रश्न नेहमी विचारला जातो. हाच प्रश्न TeamTrees ला सुद्धा विचारला जाईल मात्र तूर्तास मदत गोळा करणे आणि त्याचा वापर करून झाडे लावण्यावर त्यांचा भर असणार आहे. याबाबत पुढे काय होईल ते येणाऱ्या काळात आपणा सर्वांना दिसेलच…

Exit mobile version