फेसबुकने विकत घेतली GIPHY वेबसाइट : GIFs साठी सर्वात मोठी वेबसाइट!

GIPHY

फेसबुकने काल GIF साठी सर्वात प्रसिद्ध वेबसाइट GIPHY विकत घेतल्याचं जाहीर केलं असून याद्वारे जिफीची लायब्ररी आता इंस्टाग्राम व फेसबुक अॅप्समध्ये जोडली जाणार नाही. $400 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३०३५ कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याचं सांगण्यात येत आहे. GIPHY कडे जगातील सर्वात मोठी GIF लायब्ररी आहे. सोबत त्यांनी GIF तयार करण्यासाठी, शेयर करण्यासाठी व रिमिक्स करण्यासाठी टूल्स उपलब्ध करून दिले आहेत. सध्या व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, iMessage अशा जवळपास सर्व प्रमुख मेसेजिंग अॅप्समध्ये GIPHY च्याच GIFs वापरल्या जातात.

आजवर सुद्धा GIPHY ची सेवा फेसबुकच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेच. GIPHY च्या एकूण ट्रॅफिक पैकी ५० टक्क्यांहून अधिक ट्रॅफिक फेसबुकच्याच सेवांकडून यायचं आणि त्यातलं अर्धं ट्रॅफिक एकट्या इंस्टाग्रामचं आहे!

GIF म्हणजे Graphics Interchange Format. या फॉरमॅटचा वापर करून व्हिडीओचं अॅनिमेटेड फाईल मध्ये रूपांतर केलं जातं. ज्यामुळे त्याची साईज कमी होते. मनोरंजनात्मक हेतूने या GIF पाठवल्या जातात. (उच्चार जिफ किंवा गिफ असा केला जातो.)

आता जिफीची टीम इंस्टाग्रामच्या टीममध्ये समाविष्ट केली जाणार आहे. GIF पाठवणं आणखी सोपं व्हावं हा उद्देश असल्याचं फेसबुकने सांगितलं आहे. यानंतरही लोक आधीप्रमाणे GIF अपलोड करू शकतील, डेव्हलपर्स आणि API पार्टनर्स सुद्धा पुढेही API वापरू शकतील असं इंस्टाग्रामचे उपप्रमुख विशाल शहा यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितलं आहे.

सध्या दररोज जवळपास ७० कोटी लोक GIPHY चा कंटेंट पाहतात असं सांगितलं होतं. आता यावर अवलंबून असलेल्या इतर सेवा जसे की ट्विटर, अॅपलची iMessage, स्लॅक, स्नॅपचॅट, ट्रेलो, टिकटॉक, टेलीग्राम यापुढे काय करतील हे येणाऱ्या काळात समजलेच. फेसबुकवर याआधी बऱ्याच वेळा प्रायव्हसीवरून वाद निर्माण झाले आहेत. शिवाय या कंपन्या फेसबुकच्या स्पर्धकसुद्धा आहेत. सध्यातरी काळजीचं काही कारण नाही अस यापैकी काही कंपन्यानी ट्विट करून सांगितलं आहे.

Exit mobile version