मायक्रोमॅक्सचं भारतीय स्मार्टफोन बाजारात लवकरच पुनरागमन!

एकेकाळी भारतीय स्मार्टफोन बाजारात आघाडीला असलेली भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स आता लवकरच नव्या स्मार्टफोन्ससह परतणार आहे. सध्या सुरू असलेल्या चीनसोबतच्या पार्श्वभूमीवर भारतात चीनी वस्तूंवर बंदी घालण्याच्या मागणीने चांगलाच जोर धरला आहे. अशा वेळी भारतीय स्मार्टफोन कंपन्याना बाजारात पुन्हा स्थान मिळवण्याची संधी आहे.

मायक्रोमॅक्स आता तीन नवे स्मार्टफोन्स आणणार असून सोशल मीडियावर त्याबद्दल ग्राहकांना प्रोत्साहित करताना दिसत आहेत. हे फोन्स स्वस्तात चांगले फीचर्स देतील असं मायक्रोमॅक्सने म्हटल आहे. MadeByIndian आणि #MadeForIndian असे हॅशटॅग वापरुन ते पोस्ट्स करत आहेत.

अनेकांना ही गोष्ट अजूनही माहीत नसेल की मायक्रोमॅक्सने शेवटपर्यंत चीनमधून फोन आयात करून त्यांना रिब्रॅंड करून भारतात विक्री केली होती. हे सुद्धा त्यांच्या बाजारातून बाहेर फेकलं जाण्याचं एक कारण नक्कीच आहे. भारतीय कंपनी म्हणून प्रसिद्धीस आलेली कंपनी चक्क चीनी फोन्स रिब्रॅंड करून भारतात विकायची!

मायक्रोमॅक्स ही अशी कंपनी जी २०१३-१४ दरम्यान भारतात सर्वाधिक फोन्स विक्री करणारी कंपनी होती ती पुढे चीनी प्रतिस्पर्ध्यासमोर टिकू शकली नाही. यासाठी काही कारणे म्हणजे स्वस्त फोन्ससाठी चीनी स्पर्धा, नोटबंदी होय नोटबंदीपासूनच मायक्रोमॅक्सने त्यांचे फोन्स सादर करणं बंद केलं होतं. यासंबंधी सीईओ राहुल शर्मा यांनीही त्यावेळी म्हटलं होतं की नोटबंदीमुळे आम्हाला एक पाऊल मागं यावं लागलं. पण यावेळी मागे घेतलेलं पाऊल त्यांना परत पुढे आणताच आलं नाही. तोवर चीनी फोन कंपन्यानी स्वस्तात ड्युयल/ट्रिपल कॅमेरा, फिंगरप्रिंट रीडर, 4G असलेले फोन्स आणणं सुरू केलं. त्यावेळी मायक्रोमॅक्स, इंटेक्स, आयबॉल, लावा, कार्बन अशा सर्वच भारतीय कंपन्या बऱ्याच मागे पडल्या. आता २०१९-२०२० मध्ये चीनी कंपन्या भारतात ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा व्यापून आहेत!

२०१९ मध्ये तर मायक्रोमॅक्सने हुवावेचे फोन्स त्यांच्या दुकानात विकण्यास सुरुवात केली होती! मायक्रोमॅक्सचेही फोन्स बाजारात येत होतेच मात्र त्यांना काहीच अर्थ नव्हता आणि स्पर्धेच्या मानाने कुठेही उपस्थिती नव्हती. काही महिन्यांपूर्वी मायक्रोमॅक्सने इलेक्ट्रिक दुचाकी विकण्यास सुरुवात केली होती आणि त्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. सोबत टीव्हीसारख्या उपकरणांचीही विक्री सुरू आहेच मात्र तिथेही विशेष कामगिरी दिसून येत नाही.

भारतीय कंपन्या मागे पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे सॉफ्टवेअर सपोर्ट. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय स्मार्टफोन कंपन्या अँड्रॉइड अपडेट्स, फीचर्स व्यवस्थित देत नव्हत्या. शिवाय या कंपन्याना दर महिन्याला चार मॉडेल्स आणण्याची घाई. त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळण्याची शक्यता आणखी कमी व्हायची. सोबत सर्वच भारतीय स्मार्टफोन कंपन्या चीनी फोन्स मागवून त्यांना स्वतःची नावे चिकटवून भारतात विकायच्या! भारतीय ग्राहकांची अशीही फसवणूक यांनी केली आहे. जर तेव्हापासूनच भारतीय कंपन्यानी चांगले पर्याय दिले असते तर कोणता भारतीय उगाच चीनी फोन्स खरेदी करायला जाईल?

चीनी कंपन्यानी मात्र सॉफ्टवेअर सपोर्टबाबत ग्राहकांना चांगले पर्याय दिले. प्रत्येक कंपनीने त्यांचा विशेष ग्राहकवर्ग कम्युनिटी बनवून ठेवल्या. नवनवं हार्डवेअर, कॅमेरा व डिस्प्लेसाठी नवं डिझाईन आणलं. साहजिकच कमी किंमतीत इतक्या सुविधा मिळत असल्यामुळे भारतीय ग्राहक त्यांच्याकडे वळला. आता सुरू असलेल्या वादामुळे सर्वांचीच या कंपन्याचे फोन्स खरेदी न करण्याची भूमिका दिसून येत आहे. चीनी फोन्सना तूर्तास सॅमसंग, अॅपल वगळता विशेष पर्याय उपलब्ध नाही. सध्या एसुस, नोकिया यांच्यासोबत अल्प प्रमाणात एलजी, पॅनासॉनिक यांचे फोन्स उपलब्ध आहेत. यांच्या फोन्सचं सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन चीनमध्येच होतं. सॅमसंगने मात्र भारतातलं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे.

लेख भारतीय कंपन्याबद्दल नकारात्मक माहिती देत असला तरी ते वास्तव आहे आणि आपल्या सर्वांना ते माहीत असावं. आता या भारतीय कंपन्यानी आयत्याच चालून आलेल्या संधीचं चांगलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असलेले फोन्स उपलब्ध करून देऊन सोनं केलं पाहिजे. नाहीतर पहिले पाढे पंचावन्न होण्याचीच जास्त शक्यता आहे. गेल्या काही दिवसात चीनी अॅप्सच्या भारतीय पर्यायाबाबत झालेले प्रकार तुम्हाला माहीत असतीलच. केवळ भारतीय आहे म्हणून अमुक एका ब्रॅंडचे उत्पादन खरेदी केलं पाहिजे ही चित्र बदलावं. याऐवजी त्या भारतीय कंपनीची चांगल्या उत्पादनासाठी जगभर ओळख निर्माण व्हावी असं आम्हाला वाटतं.

Exit mobile version