ट्विटर हॅक : बराक ओबामा, बिल गेट्ससारख्या प्रसिद्ध व्यक्तींची अकाऊंट्स हॅक!

सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर हॅक करून प्रसिद्ध व्यक्तींच्या हँडल वरुन बिटकॉईन स्कॅम करणारी माहिती ट्विट करण्यात आली होती. बराक ओबामा, जो बायडन, मायकल ब्लुमबर्ग, बिल गेट्स, जेफ बेझोस, इलॉन मस्क, कान्ये वेस्ट, उबर व अॅपल यांच्या ट्विटर अकाऊंट्सचा यामध्ये समावेश होता. आजवरच्या सर्वात मोठ्या हॅकिंग घटनांमध्ये या घटनेची नोंद होईल.

आज पहाटे या अकाऊंट्स वरून “खालील बिटकॉईन अॅड्रेस वर पैसे पाठवले तर त्याच्या दुप्पट पैसे तुम्हाला ३० मिनिटात परत पाठवण्यात येतील” असे ट्विटस करण्यात आले होते. या मेसेजेस या अधिकृत अकाऊंट वरून ट्विट केल्यामुळे अनेकांनी त्यावर पैसे पाठवले असल्याचंही समोर येत असून याद्वारे लाखो रुपये हॅकर्सनी उकळले आहेत.

यासाठी हॅकर्सनी ट्विटरच्याच काही अंतर्गत गोष्टी वापरुन काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा अटॅक घडवून आणला असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जात आहे.दरम्यान ट्विटरने ते सर्व ट्विटस डिलीट केले असून व्हेरीफाईड अकाऊंट्सना तूर्तास बंधने घालण्यात आहेत तर काहींना आणखी काही काळ ट्विटस करता येणार नाहीत असे बदल करण्यात आले आहेत.

आमच्यासाठी हा खूप कठीण दिवस आहे. झालेल्या घटनेबद्दल आम्हाला वाईट वाटतं. आम्ही या गोष्टीचा तपास करत आहोत आणि आम्हाला नेमकं के झालं हे समजताच त्याची माहिती शेयर करत आहोत असं ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी ट्विटद्वारे सांगितलं आहे.

ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना टार्गेट करून त्यांच्यामार्फत हे हॅकिंग घडवून आणलं असल्याचं ट्विटरकडूनही सांगण्यात आलं आहे. सध्या हे अकाऊंट लॉक करण्यात आले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यावरच त्यांना पुन्हा अॅक्सेस देण्यात येईल.

Exit mobile version