Windows 11 सादर : अनेक नव्या सोयी, नवं डिझाईन आणि नवा स्टार्ट मेन्यू!

मायक्रोसॉफ्टने आज त्यांच्या मायक्रोसॉफ्ट इव्हेंटमध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टमची नवी आवृत्ती Windows 11 सादर केली आहे. २०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.

नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.

यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत! मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील!

Windows 11 Widgets
Windows 11 Microsoft Store with Android Apps

Minimum system requirements for Windows 11

https://aka.ms/GetPCHealthCheckApp हे ॲप इंस्टॉल करून तुम्ही तुमच्या पीसीवर विंडोज ११ वापरू शकाल का ते पाहता येईल.

Windows 10 ची Genuine/लायसन्स कॉपी असणाऱ्या सर्वांना Windows 11 मोफत मिळणार आहे! विंडोज ११ कधी उपलब्ध होणार हे जाहीर करण्यात आलं नसलं तरी ऑक्टोबर महिन्यात हे उपलब्ध होण्यास सुरुवात होऊ शकते.

काही दिवसांपूर्वीच लीक झाल्यामुळे आता बऱ्याच जणांना आज मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात विंडोज ११ सादर होणार याची कल्पना होतीच. चीनी वेबसाइट बायडूवर चक्क Windows 11 चा डेव्हलपर प्रीव्यू सुद्धा लीक झाला होता. त्यावरून विंडोज ११ कसं दिसेल याचा अंदाज आला होताच.

खरंतर मायक्रोसॉफ्टने २०१५ मध्ये विंडोज १० ही विंडोजची शेवटची आवृत्ती असेल असं सांगितलं होतं आणि विंडोज १० लाच पुढे अपडेट केलं जाईल असं ठरवण्यात आलं होतं. मात्र आता मायक्रोसॉफ्ट त्यांच्या आधीच्या व्यक्तव्यावरून माघार घेत नवी आवृत्ती आणली आहे. त्यांनी विंडोज १० च्या पेजवर आता विंडोज १० चा सपोर्ट १४ ऑक्टोबर २०२५ मध्ये बंद करण्यात येईल असं लिहिलं आहे.

Search Terms Microsoft Windows 11 What’s New in Windows 11 Download Windows 11 ISO Windows 10 Vs Windows 11

Exit mobile version