मायक्रोसॉफ्टने Activision Blizzard गेमिंग कंपनी ५ लाख कोटींना विकत घेतली!

कॉल ऑफ ड्युटी, ओव्हरवॉच, कॅन्डी क्रशसारख्या गेम्सची निर्मिती केलेली कंपनी!

Microsoft Xbox Activision Blizzard

मायक्रोसॉफ्टने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार आजवरच्या सर्वात मोठ्या व्यवहारात व्हिडिओ गेम्स तयार करणाऱ्या ॲक्टीव्हीजन ब्लिझर्ड (Activision Blizzard) कंपनीला विकत घेतलं असून हा व्यवहार तब्बल ~५,१२,४६६ कोटी रुपये (~68.7 बिलियन डॉलर्स) किंवा $95 प्रती शेयर अशा प्रकारे पार पडणार आहे! हा व्यवहार पूर्ण झाल्यावर उत्पन्नानुसार ही कंपनी Tencent आणि सोनीनंतर आता जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी गेमिंग कंपनी बनेल.

गेमिंग विश्वात आज सर्वाधिक चर्चा असलेला हा व्यवहार अजून कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर नंतर २०२३ मध्ये पूर्ण होईल. तोवर या कंपन्या स्वतंत्रपणे काम करतील. डील पूर्ण झाल्यावर ही कंपनी एक्सबॉक्सचे प्रमुख फील स्पेन्सर यांच्या नेतृत्वात काम करेल!

मायक्रोसॉफ्टची गेमिंग सबस्क्रिप्शन सेवा एक्सबॉक्स गेम पास (Xbox Game Pass) मध्ये यांच्या नव्या गेम समाविष्ट केल्या जाणार असून यामुळे गेमपास आणखी लोकप्रिय होण्यास मदत मिळेल. कॉल ऑफ ड्युटी, ओव्हरवॉच, वर्ल्ड ऑफ वॉरक्राफ्ट, Diablo, StarCraft, Crash Bandicoot अशा प्रचंड लोकप्रिय गेम्स Activision आणि संबंधित कंपन्यानी तयार केल्या आहेत. मोबाइल गेमिंगमध्येही Candy Crush द्वारे त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं.

आजची ही बातमी इतकी मोठी आहे की अजूनही यावर विश्वास बसत नसल्याचं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे!

गेल्या आठवड्यातच Take Two Interactive या कंपनीने FarmVille ही लोकप्रिय तयार करणाऱ्या Zynga कंपनीला अधिग्रहीत केलं होतं. हा व्यवहार ~८२००० कोटी रुपयांचा होता असं सांगण्यात आलं होतं आणि त्यावेळी या क्षेत्रातील जगातलं आजवरचं सर्वात मोठं अधिग्रहण ठरलं होतं. मात्र त्यानंतर आजचं Activision चं अधिग्रहण म्हणजे अनेक पटींनी जास्त मोठा व्यवहार ठरला आहे!

Exit mobile version