ट्विटरची मालकी आता इलॉन मस्ककडे : सीईओ पराग अगरवालला घरचा रस्ता!

बऱ्याच दिवसांच्या घडामोडींनंतर सरतेशेवटी आज इलॉन मस्कने ट्विटरचं अधिग्रहण पूर्ण केलं आहे. सकाळी ९.१९ वाजता ट्विटद्वारे the bird is freed असं सांगत त्याने स्वतः हे जाहीर केलं आहे. पूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार ट्विटर या सोशल मीडिया कंपनीला 44 बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ३,३७,००० कोटी रुपयांना विकत घेतलं आहे!

अधिग्रहण पूर्ण करत असतानाच नुकतेच सीईओ झालेले पराग अगरवाल, CFO नेड सिगल, पॉलिसी प्रमुख विजया गड्डे अशा प्रमुख अधिकाऱ्यांना काढून टाकलं आहे.

ट्विटर विकत घेणार हे जाहीर केल्यानंतर बॉट अकाऊंट्सबद्दल माहिती जाहीर करण्यावरून पूर्वीच्या ट्विटर अधिकाऱ्यांसोबत बरेच वाद सुद्धा झाले आणि मग तो व्यवहार बारगळला होता मात्र आज तो पूर्ण झाला आहे.

कालच इलॉनने ट्विटमार्फत त्यांच्या जाहिरातदारांसाठी (Advertisers) ट्विट करून तो ट्विटर का विकत घेत आहे याबद्दल माहिती दिली होती. सोबत “मी हे सोपं आहे म्हणून केलं नाही. आणखी पैसे कमावण्यासाठी केलं नाही. मी हे मानवतेला मदत करण्यासाठी केलं आहे” अशा शब्दात उद्देश व्यक्त केला होता!

शिवाय ट्विटरच्या ऑफिसमध्ये चक्क किचन सिंक घेऊन Let that sink in म्हणत प्रवेश केला होता.

इलॉन मस्क यांनी SpaceX, Tesla, Boring Company, OpenAI, Neuralink, PayPal अशा कंपन्याची सुरुवात केली किंवा प्रमुखपद भुषवलं असून आता ट्विटरचीही मालकी मिळवली आहे.

Exit mobile version