CES 2023 मधील घडामोडी : सर्वात मोठा टेक्नॉलॉजी मेळा

कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ५ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान पार पडला! तब्बल दोन वर्षांनी यावेळी ऑफलाइन कार्यक्रम पार पडला असून या वर्षीचा सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून येत आहे…

यावेळी १७३ देशांमधील ३२०० हून अधिक कंपन्या किंवा व्यक्तींनी त्यांची उत्पादने/संशोधन प्रदर्शित केलं आहे. या लेखामध्ये पुढे काही ठराविक कंपन्या आणि त्यांची विशेष उत्पादने यांची माहिती दिली आहे. सर्वच वस्तूंची माहिती देणं शक्य नसल्याने जी उत्पादने चर्चेत होती त्यांचाच उल्लेख इथे केला आहे.

सॅमसंग (Samsung) : सॅमसंगने नेहमीप्रमाणे आणखी मोठे टीव्ही, NEO QLED चं नवं 8K तंत्रज्ञान, दुमडता आणि सरकवून बाजूला वाढवता येणारे डिस्प्ले, Odyssey OLED नावाचा Curved डिस्प्ले असलेला मॉनिटर, 2000nits ब्राइटनेस असलेला स्मार्टफोन डिस्प्ले गेल्यावर्षी आलेल्या Freestyle प्रॉजेक्टरची नवी आवृत्ती अशी बरीच उत्पादने सादर केली आहेत. स्मार्ट थिंग्ज अंतर्गत स्मार्ट होमसाठी BeSpoke फॅमिली हब टचस्क्रीन फ्रीज, त्यामध्ये पूर्ण फ्रीजला आपल्या आवडीचं डिझाईन सेट करता येण्याचा पर्याय यासोबत स्मार्ट वॉशिंग मशीन ज्यामध्ये अनेक सेन्सर्स जोडलेले असून आपोआप कपडे धुवून देण्याचं काम ही मशीन करेल.

सोनी (Sony) : सोनीने यावेळी त्यांची होंडा कंपनीसोबत भागीदारी जाहीर करता त्यांचा Afeela ब्रॅंड जाहीर केला असून यामधील प्रोटोटाइप इलेक्ट्रिक कारसुद्धा त्यांनी प्रदर्शित केली आहे. ही कार २०२६ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. ४० हून अधिक सेन्सर्स, कॅमेरा, रडार, अल्ट्रासॉनिक आणि लायडारचा समावेश करून सोनीच्या AI, VR व AR चा वापर केलेली एक अद्वितीय कार असेल.

सोनीच्या प्लेस्टेशन विभागात Project Leonardo नावाने एक उपकरण येणार असून याद्वारे अपंगत्व असलेल्या लोकांनाही गेम्स खेळता येतील आणि तेसुद्धा सोप्या पद्धतीने!

लेनेवो (Lenovo) : लेनेवोने Yoga Book 9i नावाचा ड्युयल डिस्प्ले लॅपटॉप आणला असून दोन 13.3″ 2.8K OLED डिस्प्ले एकावर एक जोडलेले आहेत. यासोबत दुसऱ्या ThinkBook Plus नावाच्या लॅपटॉपला असलेला OLED डिस्प्ले चक्क गोल फिरवता (Twist) येतो! लेनेवोने यावेळी ThinkPhone हा फोनसुद्धा सादर केला असून हा एक बिझनेस फोन असेल याला पीसीला जोडून स्वतंत्र कॉम्प्युटरप्रमाणेही वापरता येईल.

हे सर्व फोटो एकाच कारचे आहेत!

BMW : बीएमडब्ल्यूने त्यांची कन्सेप्ट कार प्रदर्शित केली. BMW i VISION DEE ह्या कारला आपण आवडीनुसार कधीही डिझाईन रंग सर्वकाही बदलू शकता. गेल्यावर्षी आलेला अशाच कारममध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाइटचा पर्याय होता मात्र यावेळी हे तंत्रज्ञान आणखी विकसित करून तब्बल ३२ रंग यामध्ये निवडता येतील तेसुद्धा एकाचवेळी! यामुळे अवघ्या काही सेकंदात कारचं बाहेरील रूप पूर्णपणे बदलता येतं! यासाठी त्यांनी e ink डिस्प्लेचा वापर केला आहे.

एसुस (Asus) : एसुसने यावेळी पुन्हा एकदा प्रोआर्ट सिरीज लॅपटॉप्समध्ये OLED डिस्प्लेचं नवं तंत्रज्ञान जोडून लॅपटॉप आणले असून यावेळी एक 3D लॅपटॉपसुद्धा सादर केला ज्याचा 3D इफेक्ट पाहण्यासाठी गॉगल्सची गरज नाही. या इफेक्टमुळे आपण स्क्रीनवर पाहत असलेली वस्तु स्क्रीनच्या बाहेर येऊन फिरत आहे असं वाटतं!

HTC : HTC ने त्यांच्या प्रसिद्ध Vive VR हेडसेटमध्ये HTC Vive XR Elite मॉडेल आणलं असून यामध्ये AR, VR, and Mixed Reality (MR) तिन्ही प्रकारचा वापर करता येऊ शकतो! याची किंमत $1099 इतकी असेल.

L’Oréal Hapta : शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींसाठी लॉरियाल या फॅशन ब्रॅंडने लिपस्टिक Applicator आणला असून याच्या ग्रीपमुळे ज्यांना हाताची मर्यादित स्वरूपात हालचाल करावी लागते त्यांना लिपस्टिक लावणं एकदम सोपं होईल असं त्यांचं म्हणणं आहे! ही ग्रीप गिंबल प्रमाणे काम करेल!

Unisteller : या कंपनीचा नवा टेलिस्कोप आपण याच्या App मध्ये हवा तो ग्रह, तारा सिलेक्ट केला की एका क्लिकवर त्या दिशेने स्वतःला फिरवून ठेवतो! याला Eyepiece दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला स्मार्टफोनमध्येच टेलिस्कोपचं लाईव्ह दृश्य दिसेल. अवकाशातील ५००० हून गोष्टी याद्वारे पाहता येतील! शिवाय यामधील खास फीचर्समुळे लाइट पोल्युशनमधूनही हा टेलिस्कोप व्यवस्थित पाहू शकतो!

Dispace TV : या ब्रॅंडने बॅटरी असलेले टीव्ही आणले असून आपण हे उचलून कुठेही ठेवून वापरू शकता. विद्युत प्रवाह नसतानासुद्धा बॅटरीवर हा टीव्ही रोज ६ तास वापरुन जवळपास एक महिना चालेल असंही त्यांनी सांगितलं आहे! याचं वजन ९ किलोपेक्षा कमी असून हा 55″ डिस्प्ले आहे जो एका बाजूला एक असा ४ टीव्ही जोडून पूर्ण एक मोठा ११० इंची किंवा १६ टीव्ही जोडून २२० इंची डिस्प्लेसुद्धा बनवता येतो! याची बॅटरी काढून नवीन बॅटरी लगेचच बदलता येते.

German Bionic Apogee : याचा वापर करून कोणताही मनुष्य त्याचा पाठीवरचं वजन नेहमीच्या तुलनेत जवळपास ३० किलो अधिक वजन त्रास न होता उचलू शकतो! शिवाय यामध्ये जोडलेल्या AI मुळे आपण झेपेल इतकं वजन उचलत आहोत का याचीही माहिती मिळेल. हा सूट अंगावर घातल्यावर त्रास न होता वजन उचलण्याची क्षमता वाढते कारण त्या वस्तुचं वजन हा सूट त्यामधील तंत्रज्ञानामुळे स्वतः वाटून घेतो.

Exit mobile version