यूट्यूब सीईओ सुजन वोचितस्की यांचा राजीनामा : नील मोहन नवे सीईओ!

YouTube CEO

यूट्यूबच्या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सुजन वोचितस्की (Susan Wojcicki) यांनी आज आपण राजीनामा देत असल्याचं ईमेलमार्फत त्यांच्या कर्मचाऱ्यांना कळवलं आहे. त्यांची जागा सध्या यूट्यूबचे मुख्य प्रॉडक्ट ऑफिसर असलेले नील मोहन (Neal Mohan) हे घेणार आहेत. ते नवे SVP आणि यूट्यूब प्रमुख म्हणून काम पाहतील.

२०१४ पासून सुजन यूट्यूबच्या प्रमुखपदी होत्या. “आज इथल्या २५ वर्षांनंतर, यूट्यूबच्या प्रमुख पदापासून पायउतार होत आहे आणि माझं कुटुंब, आरोग्य आणि आवडीच्या कामांवर लक्ष देता येईल असं आयुष्य जगण्याचं ठरवलं आहे” असं त्यांनी सांगितलं आहे. त्या गूगलच्या सर्वात जुन्या कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत.

गूगलचे संस्थापक सर्गे ब्रिन आणि लॅरी पेज यांना गूगलच्या स्थापनेवेळी १९९८ साली सुजन यांनी त्यांचं सिलिकॉन व्हॅलीमधलं गॅरेज भाड्यानं दिलं होतं आणि नंतर त्या स्वतः एक वर्षात गूगलच्या १६ व्या कर्मचारी म्हणून रूजू झाल्या होत्या. त्यांनी गूगलसाठी आजवर मार्केटिंग, गूगल इमेज सर्च, गूगल व्हिडिओ आणि बुक सर्च, अॅडसेन्सची निर्मितीच्या सुरुवातीचा टप्पा, यूट्यूब आणि डबलक्लिकचं अधिग्रहण आणि त्यानंतर यूट्यूबचं प्रमुखपद अशी कामगिरी केली आहे.

त्यांनी सुंदर पिचाई यांच्या विनंतीस मान देत गूगल आणि अल्फाबेट या सल्लागार म्हणून यापुढेही काम करणार असल्याचंही सांगितलं आहे. माझ्या अनुभवाचा वापर करून गूगल आणि अल्फाबेटच्या कंपन्यांना मार्गदर्शन करत राहीन असं त्यांच्या मेलमध्ये लिहिलं आहे.

सुजन यांनी नवे यूट्यूब सीईओ नील मोहन यांच्यासोबत १५ वर्षं काम केलेलं असून DoubleClick कंपनीच्या अधिग्रहणावेळी त्यांचं गूगलला आगमन झाल्यापासून डिस्प्ले व व्हिडिओ अॅड्स SVP पदापर्यंत त्यांचा प्रवास झाला आहे. नील मोहन यांच्या या नव्या पदामुळे आणखी एका मोठ्या कंपनीच्या सीईओपदी भारतीय वंशाची व्यक्ती बसणार आहे!

Exit mobile version