चंद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरलं : दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश!

भारताच्या इस्रो या अवकाश संस्थेने तयार केलेल्या चंद्रयान ३ मोहिमेचा विक्रम लँडर काल यशस्वीरित्या चंद्रावर उतरला असून सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे काम करत आहेत. काही वेळातच चंद्रावर फिरण्यासाठी असलेला प्रज्ञान रोव्हरसुद्धा बाहेर पडून आता चंद्रावर फिरत आहे.

या मोहिमेद्वारे भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश आहे! इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चंद्रयान २ मधील अपयशानंतर त्यामधील त्रुटी दूर करून अधिक भक्कम लँडर यावेळी पाठवला आणि मोहीम यशस्वी केली आहे.

काल या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी करोडो भारतीय त्यांच्या फोन्स, टीव्हीवर लाईव्हस्ट्रीम पाहत होते. यूट्यूबवरील सर्वाधिक लाईव्हस्ट्रीम Viewers चा विक्रमसुद्धा आता चंद्रयानच्याच नावे झाला आहे! तब्बल ८० लाखांहून अधिक लोक एकावेळी ही लाईव्हस्ट्रीम पाहत होते.

अनेक देशांचे प्रतिनिधी, कंपन्यांचे प्रमुख यांनी भारताचं आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

Exit mobile version