Canva चं Affinity सॉफ्टवेअर आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध!

लोकप्रिय डिझाईन एडिटिंग कंपनी Canva ने Affinity Creative Suite बनवणारी Serif कंपनी गेल्या वर्षी अधिग्रहीत केली होती. या अंतर्गत त्यांच्या Affinity Designer, Photo आणि Publisher या तिन्ही सॉफ्टवेअर्सची मालकी कॅन्व्हाला मिळाली. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी या तिन्ही सॉफ्टवेअरला एकत्र करून एकच सॉफ्टवेअर बनवलं आणि ते आता चक्क सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलं आहे!

Download Link : https://www.affinity.studio

कॅन्व्हाने व्यावसायिक डिझाइन सूट अ‍ॅफिनिटी मधील वेक्टर, फोटो एडिटिंग आणि लेआऊट टूल्स एका अ‍ॅपमध्येच सर्वांना फ्री वापरता येतील. अडोबीच्या Photoshop, Illustrator आणि InDesign या तीन सॉफ्टवेअरला नवा आणि तो सुद्धा मोफत मिळणारा चांगला पर्याय म्हणून अफिनिटी सॉफ्टवेअर उपलब्ध असेल.

नवीन अ‍ॅफिनिटी सॉफ्टवेअर आता वेक्टर, फोटो आणि पेज लेआऊटची च्या सर्व सोयी एकाच अॅपमध्ये देणार असल्यामुळे वेगवेगळे अ‍ॅप उघडण्याची गरज कमी होणार आहे आणि डिझायनर्ससाठी कामाचा प्रवाह (workflow) सुलभ होणार आहे.

नव्या लाँचनंतर फक्त काही दिवसांतच अ‍फिनिटीवर दहा लाखांहून अधिक युजर्स जोडले गेले आहेत!

कॅन्व्हाने हे सॉफ्टवेअर फ्री केलं असलं तरी त्यामध्ये जिथे जिथे AI आधारित फीचर्स जोडली आहेत ते वापरण्यासाठी कॅन्व्हाचं प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल असं सांगितलं आहे. त्यामुळे मूळ सॉफ्टवेअर फ्री आणि त्यामधील AI सोयीद्वारे उत्पन्न मिळवण्याचं साधन असे दोन्ही उद्देश ते साध्य करण्याच्या प्रयत्नात आहेत.

तुमची कामे (प्रोजेक्ट्स) Locally तुमच्या डिव्हाइसवर साठवल्या जातील आणि कॅन्व्हा ती तुमच्या परवानगीशिवाय AI ट्रेनिंगसाठी वापरणार नाही, असं कंपनीने सध्यातरी सांगितलं आहे. त्यामुळे गोपनीयतेबाबत असणारा प्रश्न आणि त्याबाबतची शंका कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नवीन Affinity सॉफ्टवेअर वापरण्यासाठी Canva चं सबस्क्रिप्शन घेण्याचं बंधन नाही. त्याशिवायसुद्धा नेहमीप्रमाणे वापर करता येईलच.

विशेष म्हणजे अडोबीच्या फॉटोशॉपमधील .psd फाइल्स आपण अफिनिटीमध्येही import करून एडिट करू शकता. नव्या सॉफ्टवेअरसाठी त्यांना स्वतःचा नवीन .af नावाचा फॉरमॅट आणला आहे.

अडोबीने गेल्या काही वर्षात त्यांच्या क्रिएटिव क्लाऊडच्या सबस्क्रिप्शनच्या किंमतीमध्ये केलेली भरमसाठ वाढ आता विद्यार्थी आणि फ्रीलान्स पद्धतीने काम करणाऱ्या युजर्सच्या आवाक्याबाहेर गेली आहे. कॅन्व्हामधील मोफत टूल्स उपलब्ध होणे हा बदल त्या डिझायनर्ससाठी मोठी संधी आहे.

भारतात तरी मोठ्या प्रमाणात अडोबीचं पायरेटेड/क्रॅक केलेलंच सॉफ्टवेअर वापरलं जातं. त्यामुळे ते सोडून नैतिकता म्हणून भारतीय युजर्स अफिनिटी कडे वळण्याची शक्यता कमी असली तरी कॅन्व्हा प्रीमियमचा वापर करणारे युजर्स काही प्रमाणात अफिनिटीचा वापर सुरू करू शकतील. अर्थात अडोबीचे टूल्स अधिक प्रगत आणि अनेक वर्षे वापरात असल्यामुळे कोणत्याही कंपनीला त्यांचे युजर्स लगेच वळवणं अवघड आहे.

अडोबी सबस्क्रिप्शन मॉडेलला वैतागलेले युजर्स यामुळे पुढच्या काही वर्षांत इतर पर्याय मात्र नक्की शोधू लागतील आणि यामुळे व रोज नवनव्या रूपात येणारया AI टूल्समुळे डिझाइन व क्रिएटिव्ह कामकाजात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

Exit mobile version