स्मार्टफोनमध्ये असलेल्या स्मार्ट कॅमेऱ्यांची ही ओळख

तंत्रज्ञान स्मार्ट झालं आणि एकाच उपकरणात अनेक उपकरणं सामावून घेण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. आता हेच बघा ना , एखाद्याला खुशाली कळवण्यासाठी उपयोगात येणारा टेलिफोन नवनवीन शोधांमुळे रूपडं बदलून मोबाइल बनला. पण हा बदल तेवढ्यावरच थांबला नाही. रेडिओ , म्युझिक प्लेयर , टीव्ही , कम्प्युटर , कॅमेरा अशी उपकरणांची जंत्रीच या तळहातभर यंत्रात सामावून बसली. एक कॅमेरा सोडला तर इतर यंत्रांचे फीचर्स साधारण प्रत्येक मोबाइलमध्ये एकसारखेच असतात. पण मोबाइल फोनची निवड करताना जी अनेक फीचर्स बघितली जातात त्यापैकी एक महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे कॅमेरा. किती मेगापिक्सेलचा हा प्रश्न दुकानदाराला विचारला जातोच. अशाच काही स्मार्टफोनमध्ये असलेल्या या स्मार्ट कॅमऱ्यांची ही ओळख… 


नोकिया प्युअर-व्ह्यू ८०८ – ४१ मेगापिक्सल 


सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये सगळ्यात तगडा कॅमेरा कुठल्या मोबाइलचा असेल तर तो हा. डिजीटल कॅमेरालाही लाजवेल अशा ४१ मेगापिक्सल इमेज सेंसरमुळे या सिंबियन स्मार्टफोनला खूपच महत्त्व आलं आहे. आत्तापर्यंत कुठल्याही स्मार्टफोनमध्ये एवढ्या जबरदस्त क्वालिटीचा कॅमेरा नव्हता. जास्तीत जास्त ८ मेगापिक्सेलपर्यंत मजल मारणाऱ्या स्मार्टकॅमेरांसाठी प्युअर-व्ह्यू हा जबर धक्काच आहे. ह्या फोनमध्ये ४१ मेगापिक्सल कॅमेरा बरोबरच , व्हिडिओसाठी उत्कृष्ट समजला जाणारा १६:९ फॉरमॅट आणि ७७२८* ५३५४ रिझोल्यूशन उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ह्या फोनमध्ये ३० फ्रेम्स प्रती सेकेंड ह्या वेगाने फुल एचडी व्हिडियो रेकॉर्ड करण्याची सोयसुद्धा आहे. 
किंमत – २५ हजार रुपये 


अॅपल आयफोन ५ : ८ मेगापिक्सल 


इतरांपेक्षा वेगळं ही आपली ओळख जपणाऱ्या अॅपलने आयफोन-५मध्ये अनेक सुविधांचा भरणा केला. या सगळ्याबरोबरच कॅमेराकडेही त्यांनी विशेष लक्ष दिलं. आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा ग्राहकांसमोर आणतानाच त्यांनी पॅनोरमा व्ह्यूसुद्धा उपलब्ध करून दिला. याशिवाय कॅमेऱ्यासाठी कमी प्रकाशात फ्लॅशची सोयही करण्यात आली. हाय-डेफिनेशन म्हणजे एचडी व्हिडियो ही काळाची गरज ओळखून तशा रेकॉर्डिंगचा अंतर्भावही आयफोन-५मध्ये करण्यात आला. त्याचबरोबर फ्रंट कॅमेऱ्याच्या उपलब्धतेमुळे व्हिडियो कॉलिंगदेखील चांगलं होतं. 
किंमत – ४४ हजार रुपये 

सॅमसंग गॅलेक्सी एस ३ – ८ मेगापिक्सल 


स्मार्टफोनचं मार्केट कुणी खाल्लं असेल तर ते या कंपनीने. अँड्रॉइड या अफलातून ऑपरेटिंग सिस्टीमबरोबरच कॅमेऱ्याच्या वैशिष्ट्यांमुळेही या कंपनीचे स्मार्टफोन्स चर्चेत आहेत. त्यापैकीच गॅलेक्सी एस-३ या फोनमधला ८ मेगापिक्सेल ताकदीचा कॅमेरा त्याच्या बॅक साइड इल्युमिनिटेड या नव्या फीचरमुळे चांगलाच लोकप्रिय आहे. या फीचरमध्ये फोटो काढताना अधिक प्रकाश पडतो आणि त्यामुळेच तो चांगला येतो. याशिवाय बर्स्ट नावाचं एक खतरनाक फीचरही या कॅमेऱ्यामध्ये आहे. हे फीचर तुम्हाला एका विशिष्ट क्षणाचे २० फोटो काढून त्यातील आपल्या आवडीचा फोटो निवडण्याचा पर्याय देतो. त्यापैकी हवे तितके फोटो ठेऊन बाकीचे डीलिट करता येऊ शकतात. याशिवाय टच फोकस , स्माइल डिटेक्शन , जीओ-टॅगिंग , इमेज एडिटर हे फीचर्सही सोबतीला आहेतच.
किंमत – ३१ , ९०० रुपये. 


मायक्रोमॅक्स कॅनव्हास २ ए-११० – ८ मेगापिक्सेल 


अॅपल , सॅमसंग , सोनी , नोकिया अशा दादा कंपन्यांना तगडी स्पर्धा देणारी अस्सल देसी कंपनी म्हणजे गुडगाव स्थित मायक्रोमॅक्स. अत्यंत स्वस्त आणि मस्त हे ब्रीद घेऊन मोबाइल फोन्सची निर्मिती करणारी ही कंपनी भलतीच लोकप्रिय ठरत आहे. त्यातच कॅनव्हास २ ए-११० या नव्या मॉडेलने तर बाजारात धुमाकूळ घातला आहे. इतर फीचर्सबरोबरच नाइटमोडची सोय असणारा ८ मेगापिक्सेल कॅमेरा हेही या फोनचं वैशिष्ट्य आहे. डिजीटल ४ एक्स झूम , ऑटो फोकस , जिओ टॅगिंग अशा सगळ्या सुविधाही या फोनमध्ये आहेत. 
किंमत – १० , २९९ रुपये. 


मोटोरोला रेजर मॅक्स – ८ मेगापिक्सेल 


भारतात मोटोरोला या कंपनीचे फोन्स तितकेसे लोकप्रिय नाहीत. पण अमेरिकेत मात्र अॅपलनंतर दुसऱ्या नंबरावर हीच कंपनी आहे. नेहमी बॅकस्टेज तंत्रज्ञानात अव्वल काम करणारी ही कंपनी स्मार्टफोनच्या क्षेत्रात तगडी कामगिरी करत आहे. रेजर मॅक्स हे मॉडेल त्याच्या एकापेक्षा एक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहे. ८ मेगापिक्सेल कॅमेराबरोबरच ८ एक्स डिजीटल झूम आणि ३० फ्रेम्स प्रति सेकंद रेकॉर्डिंगमुळे उभरत्या फिल्म मेकर्ससाठी स्वस्त आणि मस्त असा हा पर्याय आहे. हाय डेफिनेशन व्हिडियो रेकॉर्डिंगची सोयही या फोनमध्ये आहे. 
किंमत – ३० , ९९० रुपये 



सोनी एक्सपेरिया एस – १२.१ मेगापिक्सल 


स्मार्टफोनच्या दुनियेत सोनीच्या एक्सपेरिया या सिरीजची विशेष ओळख आहे. इतर फीचर्सबरोबरच त्यांच्या कॅमेऱ्यासाठीही या फोनला ग्राहकांची पसंती आहे. एक्सपेरिया एस या मॉडेलमध्ये असणारा १२.१ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि १.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. १९२० बाय १०८० पिक्सेल बरोबरच ३० फ्रेम्स प्रति सेकंद या वेगाने व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. पण या सगळ्यापेक्षा या फोनमधल्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे १६ एक्स एवढं डिजीटल झूम. हे फीचर इतर कॅमेऱ्यांमध्ये क्वचितच सापडतं. याशिवाय ऑटो फोकस , थ्रीडी-स्वीप पॅनोरमा , फेस रिकग्निशन , एलइडी फ्लॅश जिओ-टॅगिंगसारखी फीचर्स आहेतच. जिओ-टॅगिंग म्हणजे एखादा फोटो कुठे काढला आहे , याविषयीची माहिती तो अपलोड करताना देता येण्याची सोय. 
किंमत – २५ , ९९० रुपये. 


नोकिया लूमिया ९२० – ८.७ मेगापिक्सल 

स्मार्टफोनच्या शर्यतीत मागे पडेल की काय , असे वाटत असतानाच नोकियाने ल्युमिया नावाची स्मार्टफोन सिरीज आणली आणि ‘ हम किसी से कम नही ‘ हे दाखवून दिलं. विंडोजसोबत ऑपरेटिंग सिस्टीमसाठी टायअप करतानाच फीचर्सचा खजानाही ग्राहकांसाठी खुला केला. ल्युमिया ९२० हा सध्याच्या घडीला चर्चेतला मोबाइल. ८.७ मेगापिक्सल कॅमेरा हे ह्या फोनचं खास वैशिष्ट्य आहे. ह्यात खास अशी इमेज-स्टेबिलाइजिंग टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे तुमचे फोटो आधी काढलेल्या फोटोंच्या तुलनेत अधिक स्पष्ट दिसतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यामधे ब्लर फोटोज येण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. याशिवाय टच फोकस , ऑटो-फोकस , जिओ-टॅगिंग , इमेज एडिटर ही फीचर्सही आहेतच. 
किंमत – ३८ , १९९ रुपये. 


स्मार्टफोनमधील इतर फीचर्समुळे तंत्रज्ञान क्षेत्राला कलाटणी मिळाली हे खरंच आहे. पण यामध्ये असणाऱ्या स्मार्टफोन्समुळे वेगळा असा डीजीटल कॅमेरा जवळ बाळगण्याची गरज जवळपास संपलीच आहे. 

Exit mobile version