सॅमसंगची नोकियावर कुरघोडी

मोबाइल आणि नोकिया यांचे अतूट नाते गेल्या दोन ते तीन वर्षांपासूनच संपुष्टात येऊ लागले होते. प्रतिस्पर्धी सॅमसंगने नोकियावर चांगलीच कुरघोडी केली आहे. देशातील महत्त्वाच्या शहरांमधील मोबाइल फोनमार्केटमध्ये सॅमसंगने नोकियाला मागे टाकल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

मार्केट ट्रॅकर कंपनी ‘जीएफके निल्सन’च्या आकडेवारीनुसार मोबाइल मार्केटमधील सॅमसंगचा शेअर हा ३१.४ टक्के इतका झाला आहे. तर नोकियाचा शेअर ३०.१ टक्के इतका झाला आहे. एकेकाळी नोकियाने देशाच्या मोबाइल मार्केटमधील ८० टक्के शेअर मिळवण्यात यश मिळवले होते.

कंपनीने देशातील ५० हजार लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७९३ शहरांमध्ये झालेल्या मोबाइल हॅण्डसेट विक्रीवरून ही आकडेवारी तयार केली आहे. ‘जीएफके निल्सन’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात प्रथमच कोरीयन कंपनी सॅमसंगने नोकियाला मागे टाकले आहे. मागील महिन्यान सॅमसंगच्या फोन्सची विक्री सर्वाधिक झाली असून, यामध्ये सॅमसंग ‘गॅलेक्सी ग्रॅण्ड’ आणि ‘नोट २’ या दोन मॉडेल्सचा समावेश आहे. महिन्याभरात सॅमसंगच्या विक्रीत तब्बल ४२.२ टक्क्यांनी, तर नोकियाच्या विक्रीत २०.७ टक्के इतकी वाढ झाली आहे. नोकियाचा ‘आशा ३०५’ हा भारतातील सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन असल्याचा दावा नोकियाने केला आहे.

Exit mobile version