‘परम युवा २’वर प्रगत देशांचे ‘क्लिक’!

param-yuva2आशिया-आफ्रिकेसह विकसनशील देशांच्या कम्प्युटिंग क्षमतेला चालना देणारा ‘परम युवा २’ हा सुपरकम्प्युटर आता अमेरिका, इंग्लंड-फ्रान्ससह प्रगत देशांमधील संशोधनप्रकल्पांमध्येही ‘एंट्री’ करीत आहे.



ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील प्रगत संगणन केंद्रात (सी-डॅक) देशातील पहिल्या सुपर कम्प्युटरची निर्मिती करण्यात आल्यानंतर ‘परम सुपर’ कम्प्युटर विकसित करण्यात आला. आता एकविसाव्या शतकातील कम्प्युटिंगचे आव्हान पेलण्यासाठी ‘परम युवा २’ हा अद्ययावत सुपर कम्प्युटर कार्यान्वित करण्यात आला आहे. तिसऱ्या जगातील अर्थात आशिया-आफ्रिकेतील कम्प्युटिंग क्षमता विकसित करण्यासाठी ‘सी-डॅक’तर्फे मोलाचा हातभार लावण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आता विकसित देशांनाही ‘परम युवा २’च्या खुणावत आहे.


अद्ययावत संशोधनासाठी कल्पनातीत वेगाने कम्प्युटिंग करण्याची गरज असते. त्यासाठीच सुपर कम्प्युटर वापरात आणले जातात. बायोइन्फोर्मेटिक्स, कम्प्युटर एडेड इंजिनीअरिंग, इव्होल्युशनरी कम्प्युटिंग, कम्प्युटेशन आणि अर्थ सायन्सेस यांसारख्या क्षेत्रांत ‘परम युवा २’ प्रगत देशांचे मैदान गाजवत आहे. केवळ चारच महिन्यांत त्याच्या क्षमतेचा ७० टक्के वापर होऊ लागला आहे. अमेरिकेतील ‘ऑरगॅनिक हेल्थ अँड सायन्स युनिव्हर्सिटी’, ब्रिटनमधील ‘बायोटेक्नॉलॉजी अँड बायोलॉजिकल सायन्सेस रिसर्च कौन्सिल’ ‘परम युवा २’चा वापर करीत आहेत.


रशियातील ‘इन्स्टिट्यूट फॉर कम्प्युटर एडेड डिझाइन’ ही संस्था ‘परम’च्या ‘कम्प्युटेड एडेड इंजिनीअरिंग’मधील संशोधनाचा लाभ घेत आहे. ‘इव्हॉल्युशनरी कम्प्युटिंग अँड इमेज प्रोसेसिंग’मधील संशोधनासाठी फ्रान्समधील पॅरिस विद्यापीठाने ‘परम युवा टू’वर ‘क्लिक’ केले आहे.
………….


अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनला जागतिक पातळीवर सुपर कम्प्युटिंगचे अनेक पर्याय उपलब्ध होते. मात्र, त्यांनी ‘परम युवा २’लाच प्राधान्य दिले. भारतीय तज्ज्ञांच्या सुपर कम्प्युटिंग क्षमतेवर जागतिक विश्वासाची उमटलेली ही मोहोरच आहे.
– प्रो. रजत मुना, महासंचालक, सी-डॅक
……………..


‘परम युवा टू’च का?


कम्प्युटिंग क्षमता ‘५४ टेराफ्लॉप’वरून वाढवून ५२४ टेराफ्लॉप
क्षमता वाढूनही जादा उर्जेची गरज नाही
अन्य सुपर कम्प्युटरच्या तुलनेत ३५ टक्के उर्जा वाचवतो.

ओंकार भिडे, पुणे

Exit mobile version