रजनीनंतर आता आलोकनाथ “बाबूजी”

रजनीकांत जोक्स, रवींद्र जाडेजा जोक्स, होऊ दे खर्चनंतर आता सोशल नेटवर्किंगचा नवीन शोध आहे ‘आलोकनाथ’ जोक्स. हिंदीतले प्रसिद्ध कलाकार आलोकनाथ यांच्या सिनेमातल्या व्यक्तिरेखांवर चिमटे काढणारे हे वनलायनर्स नेटकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत.

‘आलोकनाथ यांच्या नावावर सर्वात जास्त कन्यादान करण्याचा विश्वविक्रम आहे’, ‘आलोकनाथ यांच्याकडे एकच गाडी आहे संस’कार’, ‘आलोकनाथ जर चित्रपटात गुंड असते तर त्यांनी सिगारेटऐवजी धूप पेटवला असता’, ‘आलोकनाथ सिगारेट पित नाहीत ते अगरबत्ती पितात’, ‘आलोकनाथ यांना एखादी अनाथ मुलगी दिसली की ते लगेच तिचे कन्यादान करुन टाकतात’ या आणि अशा अनेक वनलायनर्सनी सध्या फेसबुक आणि ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. रजनीकांतच्या जोक्सनी धुमाकूळ घातल्यानंतर आता सोशल नेटवर्किंगवर आलोकनाथचे जोक्स प्रसिद्ध झाले आहेत.

आलोकनाथ हे सध्या तरुणाईमध्ये त्यांच्या ‘संस्कारक्षम’ वडिलांच्या भूमिकांसाठी लोकप्रिय झाले आहेत. कायमच संस्कार, कन्यादान, मुलीचा दु:खी, पण सज्जन बाप या शब्दांशी संबंधित व्यक्तीरेखा साकारणारे कलाकार म्हणजे आलोकनाथ. ९०च्या दशकातल्या चित्रपटांत मुलीचा दु:खीकष्टी बाप म्हणजे आलोकनाथ हे समीकरण पक्कं झालं आहे. त्यामुळे कायमच एकसारखी भूमिका साकारणाऱ्या आलोकनाथ यांच्यावर, एका वाक्यात चिमटा काढणाऱ्या जोक्सचा ट्रेण्ड गेल्या रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर सुरू आहे. आलोकनाथ किती सज्जन आहेत हे सांगताना अतिशयोक्तीपूर्ण वनलायनर्स नेटकऱ्यांच्या तिरकस कलाकारीचा उत्तम नमुना आहेत

कसा सुरु झाला ट्रेंड?

रविवारी ट्विटरवर कोणीतरी आलोकनाथ यांच्याबद्दल एक फनी वनलायनर पोस्ट केली. काही मिनिटांमध्ये हे वनलायनर अनेकांनी रिट्विट करुन इतरांना याबद्दल कळवले. पाहता-पाहता रात्री अनेकांनी #AlokNath टॅग वापरुन क्रिएटिव्ह वनलायनर्स पोस्ट करण्यास सुरूवात केली. सकाळी अनेक ट्विटरवासीय लॉगइन झाले असता. आलोकनाथ हे नाव अचानक ट्रेंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पाहून उडालेच. मात्र ट्रेंडमध्ये आलोकनाथ का या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अनेकांनी ट्विट केल्याने आलोकनाथ काही काळासाठी टॉप ट्रेंड होता. अनेकजण आपली क्रिएटिव्हीटी वापरुन भाव खाऊन गेले.

ट्विटरुन फेसबुकवर

ट्विटरवरील हा ट्रेंड दोन दिवसापासून फेसबुकवरही दिसू लागला आहे. प्रत्येक कॉमेडी पेज आलोकनाथ वनलायनर्स पोस्ट करुन हजारो लाइक्स मिळवत आहेत. याच संधीचा फायदा घेत काहींनी आलोकनाथ माईम्स, आलोकनाथ जोक्स नावाने फेसबुक पेजेस सुरू केली असून काही तासांतच त्यांना हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाली आहेत. सध्या आलोकनाथ वनलायनर्स आणि मजेशीर फोटो तयार करण्याची स्पर्धाच फेसबुक पेज अॅडमिन्समध्ये सुरू असून युजर्सना आलोकनाथ बापूजी खूपच आवडले आहेत.

रजनीपेक्षा वेगळे

रजनीकांत, रविंद्र जडेजा जोक्स हे एकाच साचातले जोक्स होते. मात्र आलोकनाथ जोक्सचा ट्रेंड हा त्याहून हटके आहे. या जोक्समध्ये आलोकनाथ यांचं व्यक्तिमत्व सांगणारे संस्कार, दुखी बेटी का बाप, बिदाई, कन्यादान, बापूजी यासारख्या शब्दांबरोबर खेळत अफलातून पोस्ट तयार केल्या जात आहेत.


आलोकनाथ यांच्यावरील काही फेसबुक पेजेस

आलोकनाथ माइम्स १२,६०० लाइक्स

आलोकनाथ जोक्स १३,६०० लाइक्स

आलोकनाथ जोक्स पीजे ३,५०० लाइक्स
Exit mobile version