आता स्मार्टफोनसाठीही पेनड्राइव्ह!

मोबाइलमध्ये मेमरी कार्ड टाकले तरी अनेकदा आपल्याला मोबाइलमधील डेटा शिफ्ट करण्यासाठी कॉर्ड कनेक्ट करूनच डेटा शिफ्ट करावा लागतो. अनेकदा मोबाइलवर ईमेलवरुन येणाऱ्या फाइल्स प्रिंट करणे शक्य होत नाही. मात्र आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या सोनी कंपनीने नुकताच खास स्मार्टफोनला कनेक्ट करता येणारा मोबाइल पेनड्राइव्ह लाँच केला आहे. 


आजच्या स्मार्टफोनच्या युगात आपण अनेकदा मोबाइलवरुनच अनेक महत्त्वाची कामे करतो. ईमेल, मेसेजेस, डॉक्युमेन्ट पाठवणे, गाणी ऐकणे आणि इतरही अनेक कामे करण्यासाठी मुख्यत: मोबाइलमधील मेमरी कार्डवरील स्पेस वापरली जाते. अधिक वापराने ते कार्ड पूर्णपणे भरून जाते. मात्र मोबाइल युएसबीने कनेक्ट करून तो डेटा ट्रान्सफर करणे त्रासदायक ठरते. हीच समस्या लक्षात घेऊन सोनी कंपनीने मोबाइल पेनड्राइव्ह बाजारात आणला आहे. हा पेनड्राइव्ह टू इन वन आहे. यामध्ये २.० युएसबी तसेच मायक्रो यूएसबी कनेक्टर दोन्ही पर्याय उपलब्ध असल्याने युझर्सला हा पेनड्राइव्ह लॅपटॉप, डेक्सटॉप पीसी, टॅबलेट तसेच स्मार्टफोनवरील डेटा ट्रान्सफर करण्यासाठीही वापरता येणार आहे. 


सोनीचा हा नवीन मोबाइल पेनड्राइव्ह अॅन्ड्रॉइड (आयस्क्रीम सॅण्डवीच ते जेली बीन) ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करतो. त्यामुळे अॅन्ड्रॉइड फोनवरून थेट या पेनड्राइव्हमध्ये सर्व फाइल्स ट्रान्सफर करता येणे सहज शक्य होणार आहे. तसेच हा पेनड्राइव्ह अॅन्ड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन असणाऱ्या अॅन्ड्रॉइड ४.४ लाही (किटकॅट) सपोर्ट करेल यासाठी कंपनी प्रयत्न करीत असून लवकरच ही सुधारीत आवृत्तीही बाजारात येणार आहे. 


मोबाइलमधून डेटा कॉपी करण्याबरोबरच महत्वाच्या कामासाठी थोड्या वेळासाठी स्मार्टफोनची मेमरी वाढवण्याच्या उद्देशानेही या पेनड्राइव्ह वापरता येऊ शकतो. एकप्रकारे तुम्ही हा पेनड्राइव्ह अॅडिशनल मेमरी कार्ड किंवा टेम्पररी मेमरी बुस्टर म्हणून वापरू शकता. या सारख्या अनोख्या डिव्हाइसमुळे युझर्सला मोबाइल वापरण्याचा वेगळा आनंद अनुभवता येईल तसेच यामुळे मोबाइल खऱ्या अर्थाने मल्टीटास्किंग होतील, असा विश्वास सोनी कंपनीने व्यक्त केला आहे. 


सोनी कंपनीने नेहमीप्रमाणे आपल्या प्रॉडक्टच्या हार्डवेअर बाबत कोणतीही तडजोड केली नसून या पेनड्राइव्हला मेटल बॉडी कोटिंग देण्यात आले आहे. हा पेनड्राइव्ह आकाराने खूपच छोटा असला तरी त्याबरोबर प्रोटेक्टीव्ह कॅप देण्यात आली आहे ज्यामुळे पेनड्राइव्ह वापरात नसताना त्याचे धूळ आणि पाण्यापासून बचाव करणे सहज शक्य होणार आहे. जरी या पेनड्राइव्हची भारतातील आगमानाची तारीख सोनीने जाहीर केली नसली तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पेनड्राइव्ह भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Extra tags : Android mobile can now have flashdrive capability with Sony device

Exit mobile version